• Sat. Sep 21st, 2024

मुलाच्या प्रचाराआधी शिंदेंच्या शिलेदाराचा प्रचार, विखे पाटलांचा मोदींच्या योजनांवर भर

मुलाच्या प्रचाराआधी शिंदेंच्या शिलेदाराचा प्रचार, विखे पाटलांचा मोदींच्या योजनांवर भर

अहमदनगर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने अहमदनगरमधून पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिर्डीतून महायुतीने खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. यासाठी महायुतीने प्रचार सुरू केला असून आपल्या मुलाचा अहमदनगरमध्ये प्रचार सुरू करण्याच्या आधी विखे पाटील यांनी शिर्डीत लोखंडे यांच्या प्रचारासाठी गावे पिंजून काढण्यात सुरवात केली आहे. शिर्डी, राहाता, संगमनेर या भागातील गावोगावी जाऊन कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांतील कामगिरी सांगण्यावर भर दिला जात आहे.

अहमदनगरमध्ये डॉ. विखे पाटील यांनी पुन्हा उमेदवारी मिळाली. मागीलवेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. त्यावेळी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाचा जाहीरपणे प्रचार करता आला नव्हता. यावेळी मात्र दोघेही भाजपमध्ये आहेत. तर विखे पाटील महसूलमंत्री आणि पालकमंत्रीही आहेत. डॉ. सुजय यांना दुसऱ्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे विखे पाटील त्यांच्यासाठी सुरवातीपासूनच प्रचाराची आघाडी उघडतील अशी अपेक्षा होता. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याच्या बैठकांमध्ये त्यांनी भाग घेतला. असे असले तरी जाहीर प्रचार मात्र शिर्डीतून सुरू केला आहे.
राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत

लोखंडे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. शिर्डी मतदारसंघाची जबाबदारीही विखे पाटील यांच्याकडेच आहे. त्यांनी आता गावोगावी जाऊन बैठका आणि सभा घेण्यास सुरवात केली आहे. तर इकडे त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील स्वत:च्या आणि पक्षाच्या यंत्रणेसह कार्यरत झाले आहेत.
मतभेद मिटले, मनभेद कायम; राम शिंदेंच्या पानभर तक्रारी, ‘सागर’वर फडणवीसांची विखेंना समज

जागा वाटपात यांचं एकमत होईना, हे केवळ सत्तेसाठी एकत्र

विखे पाटील यांनी शिर्डी भागात गोगलगाव, निर्मळ पिंप्री, अस्‍तगाव, साकुरी आणि पिंपळस येथे तसेच दाढ बुद्रूक, दुर्गापुर, हसनापूर या गावांमध्‍ये ग्रामस्‍थ, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुख तसेच मतदारांशी संवाद साधला. आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी इंडिया आघाडीच्‍या वाटचालीवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीचे जागा वाटपावर सुध्‍दा एकमत होऊ शकलेले नाही. प्रत्‍येकजण आता एकमेकांच्‍या पाठीशी खंजीर खुपसण्‍याचा आरोप करु लागला आहे. ज्‍यांचे जागांच्‍या बाबतीत एकमत होत नाही त्‍यांचे नेतृत्‍वाच्‍या बाबतीत तरी कधी एकमत होणार असा सवाल उपस्थित करुन, विचारांशी प्रतारणा करुन, एकत्रित आलेली इंडिया आघाडी केवळ सत्‍तेसाठी एकत्र आले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मी १० वर्षांत काय केलं हे दाखवून देईन, जनता पुन्हा निवडून देईल; सदाशिव लोखंडेंना विश्वास

मोदी सरकार म्हणजे जनतेच्या मनातील सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली दहा वर्षात या देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविले आहे. जी २० परिषदेचे अध्‍यक्षपद भारताला मिळाल्‍याने देशाची मान आज जगामध्‍ये उंचावली आहे. विविध क्षेत्रांमध्‍ये निर्मि‍ती करणारा भारत देश आज सर्वांना सुरक्षित वाटत असून, रोजगारांची उपलब्‍धताही आता देशामध्‍ये मोठ्या प्रमाणात होत आहे. ७३ सामाजिक योजनांच्‍या माध्‍यमातून मोदींनी समाजाला सुरक्षा कवच दिले आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍यामध्‍येही महायुतीचे सरकार उत्‍तमपणे काम करीत असून, जनतेच्‍या मनातील हे सरकार जनतेच्‍या हिताचेच निर्णय घेत असल्‍याचे त्यांनी सांगि‍तले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed