Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवरील काही भागाचं नुकतच मेलडी रोडमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. परंतु, परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केलेल्या तक्रारींमुळे महापालिकेने डेसिबल लेवलचा अभ्यास सुरू केला आहे.
दिवसभर गाणं सुरू
11 फेब्रुवारीला मुंबईतील कोस्टल रोडवर मेलडी रोडची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये रोडवरती पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. या पट्ट्यांवरून कोणतंही वाहन ताशी 60 – 80 कीमी वेगाने गेल्यावर ए.आर. रहमानचं जय हो हे गाणं वाजायला सुरूवात होते. सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत या मार्गावर हे गाणं सुरू राहतं. त्यामुळे जवळच ब्रीच कँडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी याबद्दल तक्रार केली होती. दिवसभर वाजणाऱ्या गाण्यामुळे रहिवासी वैतागले होते.
Rail Neer: रेल्वे स्थानकांवरील ‘रेल नीर’ झालं बंद, ठाणे ते कर्जतदरम्यान विक्री थांबवली; प्रवाशांसाठी खासगी बाटलीबंद पाण्याचा पर्याय
मेलडी रोड सुरू होताच अवघ्या काही दिवसांतच तक्रारी येऊ लागल्या. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतत वाजणाऱ्या गाण्याचा त्रास होत होता. शिवाय परिसरात शाळा व रुग्णालय असून विद्यार्थी आणि रुग्णांनाही या आवाजाचा त्रास होत आहे असा दावा अनेक नागरिकांनी केला होता. त्यानंतर ब्रीच कँडी परिसरातील नागरिकांनी महापालिकेला याविरोधात पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी या समस्येवर तोडगा काढण्याची किंवा मेलडी रोडवर पूर्ण विराम लावण्याची मागणी केली. या वरती एकूण 650 परिवारांनी स्वाक्षरी करत ते पत्र महापालिका आयुक्त भूषण गगराणींना पाठवलं होतं.
नागरिकांचं महापालिकेला पत्र
यावेळी नागरिकांना मेलडी रोडमुळे दिवसभर नागरिकांना अस्वस्थ वाटतं असं नमूद केलं. या सेवेचा नागरिक आणि प्रवाशांना कोणताही फायदा होत नसून शहरांत उगाच आवाज वाढतो आहे अशी टीका देखील केली. सतत त्यांच्या घरात दबलेला आवाज घुमत राहतो. हा आवाज मोठा नसला तरी दररोज कानावर पडल्यामुळे नागरिका हैराण झाले आहेत असेही त्यांनी त्या पत्रात लिहिले होते.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: जपानऐवजी भारतातच बनवणार देशातील पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिला टप्पा 2027मध्ये
या पत्राची नोंद घेऊन आता महापालिकेने यासंदर्भात अभ्यास सुरू केला आहे. रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन आम्ही ते या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मेलडी रोडच्या डेसिबल पातळीचे निरिक्षण करून यावरून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं. हा मार्ग तयार करण्यासाठी 6.21 कोटींचा खर्च झाला होता.
