• Thu. Mar 12th, 2026
    Mumbai Child Assault Cases: लहान मुलांसाठी मुंबई असुरक्षित? 2023मध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद, मुख्यमंत्र्यांनी सांगितली आकडेवारी

    Mumbai Child Assault Cases: शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी राज्यातील बालकांवरील अत्याचारासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती समोर आली.

    बालकांवर सर्वाधिक अत्याचार मुंबईत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असले तरी मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, राज्यात अशा अत्याचारांचा आकडा वर्षागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. यातही बालअत्याचाराच्या सर्वाधिक दोन हजार ९९२ गुन्ह्यांची नोंद मुंबई शहरात झाली असल्याचे २०२३मधील आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यापैकी ९५.५ टक्के गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती मंगळवारी विधानसभेत देण्यात आली.

    राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, सन २०२१मध्ये राज्यात बालकांवरील अत्याचाराच्या एकूण १७ हजार २६१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. सन २०२३मध्ये हे प्रमाण २२ हजार ३९०वर पोहोचले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: ‘सोशल’ बदनामीला बसणार चाप; पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
    मुंबई शहरात २०२३मध्ये एकूण दोन हजार ९९२ गुन्हे नोंदण्यात आले. त्यातील ९५.५ टक्के म्हणजे दोन हजार ८९५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. ठाणे शहरात हेच प्रमाण ९७.९ टक्के इतके होते. शहरात यावर्षी एक हजार ३२४ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी एक हजार २९६ गुन्हे उघड करण्यात आले. मिरा-भाईंदर येथे ६०७ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ६०१ गुन्हे उघड करण्यात आले. पुणे शहरात ३९५ गुन्हे दाखल झाले, त्यापैकी ३९२ उघड झाले, तर पुणे ग्रामीण भागात नोंद झालेल्या सर्व ३९५ गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    Maharashtra TimesMumbai Airport: वाराणसीला निघाल्या, रुग्णवाहिकेतून परतल्या; मुंबई विमानतळावर पाय घसरुन पडल्याचा वृद्ध महिलेचा आरोप
    राज्यात ४९ विशेष बाल पोलिस पथके
    बाल न्याय अधिनियम २०१५ कायद्याअंतर्गत पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली राज्यात ४९ विशेष बाल पोलिस पथके सक्रिय आहेत. तसेच, अत्याचारपीडित बालकांच्या समुपदेशनाकरिता १२४ विशेष समुपदेशन केंद्र कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा