लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक काल पुण्यात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली. पुणे लोकसभा निवडणुकीतील तिसरे तगडे उमेदवार म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे वसंत मोरे यांची उपस्थिती निवडणूक उमेदवारीची संकेत देत होती.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
पुण्यातून मराठा समाजाचे उमेदवार म्हणून वसंत मोरे असतील का? असा प्रश्न होता. मात्र बैठकीनंतर वसंत मोरे यांचा पत्रकारांनी बाईट घेण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान बैठकीमधील काही ‘चमको’ समन्वयकांनी वसंत मोरे यांना हटकलं आणि चर्चेपासून विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला. वसंत मोरेंना याचा राग आला आणि ते तडकाफडकी त्या ठिकाणावरुन निघून गेले. उमेदवारीचा फॉर्म न घेताच मोरे निघून गेल्याची माहिती आहे.
मराठा मतांवर डोळा
भारतीय जनता पक्षाने पुण्यातून मराठा समाजातील माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवले आहे. वसंत मोरे हे देखील मराठा आहेत. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोरे यांच्या रूपाने मराठा मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो, असे गणित उच्चपदस्थ राजकीय नेत्यांकडून मांडण्यात आल्याची चर्चा आहे.