Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांपैकी अनेकांनी थेट अध्यक्षपदांवर दावा केला असून, काहींनी अध्यक्ष-उपाध्यक्ष या दोन पदांपैकी एकाची मागणी केली
जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या १८ मार्चला या निवडणुका होतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने थेट अर्ज मागविले आहेत. त्यानुसार इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे अर्ज दाखल केले आहेत.
सुनेत्रा पवार घेणार निर्णय
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी जुन्यासह नव्या उमेदवारांना अधिक संधी दिली होती. अजित पवार यांना जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटातील स्थिती, तेथील स्थानिक राजकारण याची खडानखडा माहिती होती. त्यामुळे पदाधिकाऱ्याने काहीही सांगितले, तरी त्याचे किती ऐकायचे आणि त्याला कोणते पद द्यायचे, हे अजितदादांना चांगलेच ठाऊक होते. ज्या तालुक्यात आमदार नाही, तेथील कार्यकर्त्यांना ताकद देण्याची त्यांची पद्धत होती. त्यानुसार त्यांनी अनेक तालुक्यांतील कार्यकर्त्यांना ताकद दिलीच; त्याशिवाय त्यांच्या पदरात पदांचे मापही टाकले; पण त्यांचे निधन झाल्याने आता कोणत्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची, याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे अर्ज मागवल्याचे सांगण्यात आले.
इंदापूरचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची नोंदणी करण्यात आली आहे.
BMC Election : काँग्रेस-सपा नगरसेवकांकडून ठाकरेंचा गेम, प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकीत श्रद्धा जाधवांचा एका मताने पराभव
कोणी कोणी केली मागणी?
दौंड तालुक्यातून ज्येष्ठ सदस्य वीरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात; तसेच भोरमधून विक्रम खुटवड यांनीही अध्यक्षपदासाठी मागणी केली आहे. बारामतीचे करण खलाटे यांनी दावा केला आहे. आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, मुळशीतून शांताराम इंगवले यांनी अध्यक्षपदासाठी दावा करताना उपाध्यक्षपदही द्यावे, अशी मागणी केली. ज्येष्ठ सदस्या सुजाता पवार आणि मोनिका हरगुडे; तसेच इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही उपाध्यक्षपदासाठी मागणी केली. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी निवडून आले आहेत. त्यामुळे एक पद मिळावे, यासाठी आमदार सुनील शेळके आग्रही आहेत.
KDMC मध्ये मनसेची शिंदेंशी हातमिळवणी, पण महापालिकेत स्वतंत्र दालनच नाही, पालिका आयुक्तांनी अभिप्राय मागवला
इच्छुकांची संख्या अधिक
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन्ही पदांसाठी अडीच अडीच वर्षे संधी देण्याची पद्धत होती. मात्र इच्छुकांमुळे यंदा सव्वा सव्वा वर्षे कार्यभार करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय जाहीर केला नाही. मात्र, सर्व सदस्यांना खूष ठेवण्यासाठी सव्वा वर्षे देण्याची नवी पद्धत अंमलात येण्याची शक्यता आहे.
