• Sat. Sep 21st, 2024

ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली असली, तरी उर्वरित मतदार संघांमध्ये अद्याप उमेदवारांची औपचारिक घोषणा झालेली नाही. महायुतीमध्ये ठाणे मतदारसंघावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि महाविकास आघाडीत भिवंडी मतदार संघावरील दाव्यांमुळे उमेदवारीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिवाय ठाणे, कल्याणमधील विद्यमान खासदार निवडणुका लढवणार असल्याचे बोलले जात असले, तरी त्यांच्याही नावाची अद्याप औपचारिक घोषणा होऊ शकली नसल्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा अद्याप उडालेला नाही.भारतीय निवडणूक आयोगाकडून १६ मार्चला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. देशभर आचारसंहिता लागू झाली. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदार संघामध्ये २० मे रोजी मतदान होणार असून, त्यासाठीची प्रक्रिया २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. देश आणि राज्य पातळीवर निवडणुकीचा ज्वर चढत असताना, ठाणे जिल्ह्यातील सर्वच मतदार संघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, उमेदवारांवर अद्याप एकमत होत नसल्यामुळे मतदार संघामधील उमेदवारांबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये प्रत्येक दिवशी पक्षांमधील रस्सीखेच आणि नव्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू होत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचार सुरू करण्याबद्दल निर्णय होत नाही. परिणामी इच्छुकांमधील धाकधुक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी पुरेसा वेळ असताना, उमेदवारी निश्चित होत नसल्याने प्रचार सुरू करण्यात अडथळा निर्माण होत आहे. विद्यमान खासदारांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे प्रत्येक भागातून त्यांच्या प्रचाराच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. परंतु, विरोधी पक्षांसाठी उमेदवारी मिळवण्याचे आव्हान निर्माण झाल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे.

‘शिरूरचा खासदार डायलॉगबाजीत वस्ताद’, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका

युती, आघाडीत उमेदवारांचा पेच

ठाण्यात महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाली नसल्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराची दिशा ठरलेली नाही. इच्छुकांनी आपल्या पातळीवर मोर्चेबांधणी केली असली, तरी उमेदवारी घोषित झाल्यानंतरच प्रचाराचा नारळ फुटू शकणार आहे. पक्षपातळीवर कार्यकर्त्यांना जमा करून कोणत्याही क्षणी प्रचार करण्याची तयारी केली जात आहे. कल्याण आणि भिवंडीमध्ये महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निवडला गेला नसल्यामुळे तेथील पदाधिकारी उमेदवार जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील गोंधळाचे वातावरण कायम आहे.

आनंद परांजपेंकडे ठाण्याची मोहीम, तिन्ही खासदार निवडूण आणणार?

बंडखोरी टाळण्यासाठीचे प्रयत्न

आघाडी आणि युती करून इतर पक्षांना जवळ करण्याची रणनिती मोठ्या पक्षांकडून आखली जात असली, तरी जागावाटपामध्ये पक्षाला जागा मिळाली नाही, तर बंडखोरी करून विरोधी पक्षामध्ये जाण्याचा धोका सर्वच पक्षांना आहे. त्यामुळे या भागात बंडखोरी टाळण्याच्या दृष्टीने जागा निश्चिती आणि उमेदवारी देण्यामध्ये वेळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यांमधील निवडणुकांकडे पक्षाकडून लक्ष देण्यात आल्यामुळे पाचव्या टप्प्यातील उमेदवारी घोषित करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ न मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी या भागातील उमेदवारांच्या नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed