• Fri. Mar 13th, 2026

    वाहतूकदारांना अखेर दिलासा! थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम होणार माफ; राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर

    वाहतूकदारांना अखेर दिलासा! थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम होणार माफ; राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर

    E-Challan: महाराष्ट्रातील वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम माफ करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश चेमटे, मुंंबई : ई-चलानविरोधात आक्रमक पाऊल उचलणाऱ्या वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी परिवहन विभागाने निर्णायक पाऊल टाकले आहे. वाहतूकदारांच्या थकीत ई-चलान दंडापैकी ५० टक्के रक्कम माफ करावी, असा प्रस्ताव विभागाने सरकारकडे पाठवला आहे. त्यासोबतच वाहतूकदारांसाठी अभय योजना लागू करण्याचाही विचार सुरू आहे.

    5 लाखांपर्यंत थकीत रक्कम

    रस्ते वाहतुकीला शिस्त लावण्यासह अपघात नियंत्रणासाठी राज्यात ई-चलान प्रणाली आहे. परिवहन विभागासह वाहतूक पोलिसांकडूनही प्रणालीचा वापर होतो. ई-चलानच्या माध्यमाने वाहतूकदारांच्या वाहनांचे फोटो काढून वाहनमालकांच्या मोबाइलवर दंडाच्या रकमेचा संदेश झळकतो. अनेकदा मोबाइलमध्ये संदेश येत नाही, मात्र वाहनाचे पासिंग करताना हजारो रुपयांचा दंड थकीत असल्याचे चालकांना समजते. विशेष म्हणजे, राज्यात ई-चलानची थकीत रक्कम ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत असलेले अनेक वाहतूकदार आहेत.Maharashtra TimesMumbai Metro: ‘लास्ट माईल’ सेवेवर प्रवाशांनी पाठ फिरवली! मेट्रो 3च्या अनेक स्थानकांवरील बस सेवा बंद; प्रतिसाद का नाही?

    90 दिवसांत भरल्यावर सूट

    परिवहन विभागाने ई-चलानच्या थकीत दंड आणि नव्याने येणाऱ्या दंडासाठी स्वतंत्र उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. वाहनधारकांच्या थकीत दंडाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम माफ केल्यास वाहतूकदारांवरील आर्थिक ताण काहीसा कमी होणार आहे. त्यामुळे वाहतूकदार दंड भरण्यास पुढे येतील. नव्याने ई-चलान प्राप्त झाल्यावर ९० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरल्यास वाहतूकदारांना काही टक्के सूट देण्यात येणार आहे. यामुळे दंडाच्या रकमेचा वेळच्या वेळी भरणा होईल, असा विश्वास परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

    राज्यातील वाहतूकदारांवरील ई-चलानच्या थकीत दंडाची रक्कम ही अंदाजे पाच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या महसुलावर राज्य सरकारला पाणी सोडावे लागणार आहे. सद्यस्थितीत अभय योजना नगर परिषदा, नगरपंचायतींसह महापालिकांमध्ये मालमत्ताधारक थकबाकीदारांसाठी लागू आहे. यामुळे यात मालवाहतूकदारांचीही भर पडल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होणार नाही, असे अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    ई-चलान प्रणालीविरोधात वाहतूकदार संघटनांचं मुंबईत चक्काजाम आंदोलन, परिवहन मंत्री काय म्हणाले?

    राज्यातील वाहतूकदारांनी ई-चलानच्या मुद्द्यावर ५ मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले होते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन २४ तासांत स्थगित झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने लेखी आश्वासनामुळे तूर्त आंदोलन स्थगित केले आहे. वाहतूकदारांच्या हिताचा निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा