‘आढळरावांची घरवापसी झाली आहे. कोल्हे यांना मी शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आणून खासदार केले. त्यांची घरवापसी करायची झाली, तर शिवसेना, मनसे असे अनेक पक्ष शोधावे लागतील, असा टोला पवार यांनी लगावला. ‘नेता पराभूत होत नसेल, तर कलाकाराला समोर उभे करावे लागते. याचप्रमाणे मी कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात उभे केले. आढळरावांचा पराभव करताना आमच्या तोंडाला फेस आला होता,’ अशी कबुली देऊन आता त्याच आढळरावांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन पवार यांनी केले.
‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका केली, असे कोल्हे सांगतात; पण त्यांनी नथुराम गोडसेचीही भूमिका केली होती. हे सांगितले, तर काँग्रेसचे लोक त्यांना मतदान करतील का,’ असा सवाल त्यांनी केला.
‘वीस वर्षांनी मी राष्ट्रवादीत’
‘राजकारणात भांड्याला भांडे लागते. दिलीप मोहिते यांच्याशी वैयक्तिक हेवेदावे नव्हते. अनेक पर्याय असताना अजित पवार यांनी मला पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. मी २० वर्षे बाणाशी प्रामाणिक राहिलो. आता पुन्हा ‘राष्ट्रवादी’त आलो आहे,’ अशी भावना शिवाजीराव आढळराव यांनी व्यक्त केली. ‘बेडूकउडी अशी टीका करणाऱ्या माझ्या मित्राने मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास केला आहे,’ असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला.
शहरी भागातला मतदार कमळ दिसले नाही, की परत जातो. कमळ, बाण आणि घडाळ्याला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत हे सांगावे लागणार आहे. शहरात कमळ आणि जिल्ह्यात घड्याळ व बाण चालवायचा आहे, हे मनात ठसवा.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री