• Mon. Nov 25th, 2024

    निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान

    निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर याला आयोग जबाबदार आहे. त्यामुळे नागरिकांनी आयोगाची मनमानी खपवून घेवू नये. त्यांच्या विरोधात मोर्चे काढावे, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी अमरावती येथे केले.

    अमरावती दौऱ्यावर आलेले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीनंतर स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे पत्रपरिषदेत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, निवडणुका जाहीर झाल्या की, त्या घेतल्याच पाहिजे. मात्र निवडणूक आयोग कायद्याने वागत नाही. आयोग केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काम करीत आहे. निवडणूक आयोग निःपक्षपाती राहण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यास सांगितले तरी आयोग निवडणूक घेत नाही, असाही आरोप त्यांनी केला. आयोगाची कार्यपद्धती जनविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेने आयोगाविरोधात उठाव केल्यास आयोग जबाबदार राहणार आहे. यामुळे आयोगाने वेळेवर निवडणुका घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    मला निमंत्रण नाही

    अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मला निमंत्रण आले नाही. माझ्या अकोला आणि मुंबई येथील घरी निमंत्रण आले नाही, असे आंबेडकर म्हणाले.

    खासदार नवनीत राणा कारागृहात जातील

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या जात प्रमाणपत्र प्रकरणावरून आगामी सहा महिन्यांत कारागृहात जातील असे संकेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. खासदार राणा यांचे सध्या घूमजाव सुरू आहे. भाजपा पाठिंबा देणार, राष्ट्रवादी पाठिंबा देणार अशाप्रकारचे वक्तव्ये त्या करीत असतात, असे आंबेडकर म्हणाले.

    काँग्रेस व राष्ट्रवादीवर निशाणा

    यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. जागावाटपाबाबत शिवसेनेसोबत(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमची चर्चा झाली आहे. शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षासोबत बोलत आहे. परंतु दोन्ही काँग्रेस आम्हाला वेटिंगवर ठेवत असल्याचे ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *