• Sun. Mar 15th, 2026
    Sunil Tatkare : खासदार सुनील तटकरेंची आमदार महेंद्र थोरवेंविरोधात कोर्टात धाव, 65 कोटींचा मानहानी दावा

    रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटी ३ हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मंगेश काळोखे हत्याप्रकरणामुळे राजकीय संघर्ष पेटला आहे.

    सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर दाखल केला मानहानीचा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात तब्बल ६५ कोटी ३ हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आमदार थोरवे यांनी केलेल्या गंभीर आणि निराधार आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत हा खटला दाखल करण्यात आला आहे. हा दावा माणगाव येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून, या प्रक्रियेसाठी सुमारे ३ लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्कही भरल्याची माहिती समोर आली आहे.

    मंगेश काळोखे हत्याकांडानंतर आरोप

    खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या मंगेश काळोखे हत्याकांडानंतर २७ डिसेंबर २०२५ रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही गंभीर आरोप केले होते. या मुलाखतीत रायगड जिल्ह्यात ‘रक्तरंजित राजकारण’ सुरू असल्याचे सांगत त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप केल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले आहे. तटकरे हे जिल्ह्याचे ‘आका’ असल्यासारखे वागत असून त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जीवे मारले जात असल्याचा आरोप थोरवे यांनी केल्याचेही दाव्यात म्हटले आहे.

    हत्येच्या कटाचा आरोप

    याशिवाय ‘मंगेश’ नावाच्या व्यक्तीच्या हत्येमागे सुनील तटकरे यांचा हात असून ही घटना पूर्वनियोजित असल्याचा दावा थोरवे यांनी केल्याचेही दाव्यात नमूद करण्यात आले आहे. या विधानांमुळे आपली सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मोठ्या प्रमाणात डागाळली गेल्याचा दावा करत खासदार तटकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

    तटकरेंचा आरोपांचे खंडन

    खासदार तटकरे यांनी या सर्व आरोपांचे ठामपणे खंडन केले आहे. आपल्या तीन दशकांच्या सार्वजनिक जीवनात आपण विविध महत्त्वाची पदे भूषवली असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत आपल्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार थोरवे यांच्या विधानांमुळे आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि दहशत पसरवणारी असल्याचा चुकीचा संदेश समाजात जात असल्याचेही त्यांनी दाव्यात नमूद केले आहे.

    न्यायालयाकडे काय मागण्या?

    या प्रकरणात खासदार तटकरे यांनी न्यायालयाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप खोटे आणि मानहानीकारक असल्याचे जाहीर करावे, तसेच तटकरे यांची बदनामी करणारे व्हिडिओ आणि संबंधित सामग्री सर्व सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्यास थोरवे यांना मनाई करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.

    ६५ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

    मानसिक, सामाजिक आणि राजकीय हानी झाल्याचा दावा करत खासदार तटकरे यांनी ६५ कोटी ३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

    या घडामोडीमुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा