• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

    मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पसरलेल्या धुक्याच्या दुलईने मुंबईकरांना थंडीची अनुभूती करून दिली. डिसेंबरमध्ये गारठ्याचा एखाद-दुसरा दिवस अनुभवल्यानंतर अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीची जाणीव मुंबईकरांना झाली. शनिवारी सांताक्रूझ येथील तापमान शुक्रवारपेक्षा आणखी खाली उतरले. शनिवारी सांताक्रूझ येथे १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. कुलाबा येथे मात्र २० अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

    राज्यात तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण असताना, तसेच मुंबईमध्येही आर्द्रतेचे प्रमाण अधिक असताना, मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट नोंदली गेली आहे. मुंबईमध्ये शनिवारी सकाळी कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही केंद्रांवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता होती. वातावरणातील आर्द्रता वाढते, तेव्हा किमान तापमानात वाढ होते. मात्र, सांताक्रूझ येथे शुक्रवारपेक्षा १ अंशांने किमान तापमानात घट झाली. डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीतील हे यंदाचे सर्वात किमान तापमान आहे. मुंबईसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये थंडी अनुभवता येत असल्याने आत्ता थंडीचा मोसम सुरू झाला आहे.

    थंड वाऱ्यामुळे नाशिककर गारठले; ५.६ किमी वेगाने वारे, पारा १३.५ अंश सेल्सियसवर

    शनिवारी उत्तर कोकण वगळता किनारपट्टीवर इतर कुठेही किमान तापमानात घट झालेली नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. त्यातही मुंबईतही सांताक्रूझ केंद्रावर घट नोंदली गेली. उत्तर कोकणावर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम झाल्याने ही घट झाली. देशात पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली येथे शनिवारनंतर रविवारीही कडाक्याची थंडी जाणवण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्येही तुरळक भागात थंडी जाणवू शकते. राजस्थानमधील तापमानाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर, तसेच उत्तर मुंबईवरही होतो. उत्तर कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात मात्र किमान तापमानात वाढ झालेली आहे. सरासरीपेक्षा चार ते सहा अंशांनीही किमान तापमान अधिक आहे. मुंबईचे किमान तापमानही पुन्हा वाढू शकेल, अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागने वर्तवली आहे. हे तापमान सोमवारी २१ अंशांपर्यंतही जाऊ शकेल. रविवार आणि सोमवारी आभाळ ढगाळ राहील, असाही अंदाज आहे. त्यामुळे मुंबईमध्ये थंडीची झालेली ही सुखद जाणीव दीर्घ काळ टिकणार नाही, असा सध्याचा अंदाज आहे. या काळामध्ये आग्नेय दिशेकडून वारे वाहतील.

    राज्यात मंगळवार १० जानेवारीपर्यंत ढगाळलेले वातावरण असेल, तसेच तुरळक ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता अधिक जाणवते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर गुरुवार ११ जानेवारीपासून उत्तर भारत आणि ईशान्येकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीची जाणीव होऊ शकेल, असे ते म्हणाले.

    दिल्लीत थंडी, सुप्रिया सुळेंनी कोवळ्या उन्हात बसून कुटुंबासोबत वेळ घालवला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed