• Sat. Sep 21st, 2024

POP गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशीच विसर्जन करा, नाशिक महापालिकेचा फतवा, कारण काय?

POP गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशीच विसर्जन करा, नाशिक महापालिकेचा फतवा, कारण काय?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी घातली असल्याने महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिक, पीओपीचे मूर्तिकार, साठवणूकदार, तसेच विक्रेत्यांनी पाचव्या दिवशीच कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा फतवा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काढला आहे. या निर्णयाचे पालन केले नाही तर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० च्या सुधारित नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी जाहीर केली आहे. उच्च न्यायालयानेदेखील ही बंदी कायम केली आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्तीनिर्मिती, आयात, साठा बंदीबाबत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती निर्मिती, आयात, साठा करणारे व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणीसाठी एक जानेवारी २०२१ पर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुदतवाढ दिली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याने महापालिकेने पाचव्या दिवशीच सर्व मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा फतवा काढला आहे.
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवात भेसळयुक्त मिठाईपासून राहा सावध; कशी ओळखाल मिठाईतील भेसळ? जाणून घ्या
असा आहे आदेश

नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तिकार, साठवणूकदार, तसेच विक्री करणाऱ्यांकडे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्ती असतील तर त्या मूर्तींचे कृत्रिम तलावात पाचव्या दिवशीच विसर्जन करावे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मूर्ती नदीपात्रात वा नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात विसर्जित करू नये. या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे संबंधीतांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed