मुंबई ते नाशिकदरम्यान रेल्वे वाहतुकीला बळ देण्यासाठी २०१६मध्ये प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले होते. कल्याण ते कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गिका महत्त्वाचा टप्पा आहे. रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या जमीनवगळता वनजमीन आणि खासगी जमिनींचे संपादन रखडल्याने प्रकल्प लांबला आहे.
कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेची एकूण लांबी ६७.३५ किमी आहे. प्रकल्पासाठी ४९.२३ हेक्टर जमीन आवश्यक असून, यापैकी ३५.९६ हेक्टर अर्थात ७३ टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. १३.२७ हेक्टर जागेच्या संपादनासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पात ८.२३ हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. प्रकल्पासाठी ७९२.८९ कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्च २०२६ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकेतील कल्याण ते आसनगावपर्यंत सिग्नल संबंधित कामे पूर्ण झाली आहे. प्रकल्पांतर्गत २०५ लहान-मोठे पूल उभारण्यात येणार आहे. यापैकी २० पुलांची कामे पूर्ण झाली आहे ५ मोठ्या पुलांची उभारणी सुरू आहे. लोकल मार्गिकांसाठी ओव्हरहेड वायरला आधार देणारे १७० खांबाची उभारणी पूर्ण झाली असून, प्रकल्पांतर्गत एक हजार खांबांची उभारणी करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी ३ अ प्रकल्पसंचात कल्याण ते आसनगावदरम्यान चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पाचे भू-संपादन एकाच वेळी करण्यात येणार आहे. भू-संपादन वेगाने होण्यासाठी प्रकल्पबाधितांची आर्थिक भरपाई तातडीने देण्याची सूचना केंद्र आणि राज्य सरकारने दिल्या आहेत.