• Mon. Mar 16th, 2026
    Leopards Death In Maharashtra: राज्यात 5 वर्षांत 675 बिबट्यांचा मृत्यू; सर्वाधिक घटना पुण्यात, तर नाशिक दुसऱ्या क्रमांकावर

    चैत्राली चांदोरकर, पुणे : गेल्या पाच वर्षात नैसर्गिक कारण, रस्त्यांवरील अपघात, विहिरीत पडल्याने, विजेचा धक्का आणि शिकारींमुळे राज्यातील ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्यांचे सर्वाधिक म्हणजेच १८१ मृत्यू हे पुणे विभागात झाले असून, नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. विविध पातळ्यांवर उपक्रम राबवूनही बिबट्यांचे मृत्यू आणि त्यांच्यामुळे होणारी मनुष्यहानी या दोन्ही घटना कमी करण्यास वन विभागाला यश आलेले नाही. दरम्यान याच कालावधीमध्ये राज्यात १८७ वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

    बिबट्यांची संख्या वाढल्याचे कारण दाखवून वन विभागाने जुन्नर भागातील पन्नास बिबटे गुजरातमधील वनतारा या वन्यजीव संस्थेकडे पाठवले. एकीकडे बिबट्यांकडून होत असलेले हल्ले वादग्रस्त ठरत असताना, वनक्षेत्रात राहणारे बिबटे किती सुरक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे अर्ज केला होता. त्या आधारे मिळालेल्या माहितीतून गेल्या पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

    Pune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?
    बिबट्याचा मुक्तसंचार मनुष्यासाठी आणि त्याच्यासाठीही घातक ठरतो आहे. राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरील अपघातांमध्ये पुणे वन विभागात पन्नासहून अधिक बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. दोन जंगलांना जोडणारे वनपट्टे आता विरळ झाले आहेत. परिणामी, रात्री-पहाटेच्या वेळी रस्ता ओलांडताना बिबट्याला वाहनांची धडक बसते आहे. तीसपेक्षा जास्त बिबटे विहिरीत पडल्याने मृत्युमुखी पडले आहेत. शेतांच्या कुंपणाला बसविण्यात येणाऱ्या विजेच्या ताराही वाघ आणि बिबट्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत.

    २०२५ संघर्षाचे वर्ष
    -ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागात मानवी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते, पाच लोकांचा मृत्यू.
    -संघर्ष रोखण्यासाठी पुणे वन विभागाने २०२५ मध्ये ६८ बिबट्यांना जेरबंद केले
    -जुन्नरमधील माणिकडोह बचाव केंद्र पूर्णपणे भरल्याने, जिल्ह्यातील ५० बिबट्यांना गुजरातच्या ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्याचा निर्णय

    बिबट्यांच्या अपघाताची कारणे
    -उपनगर, गावपातळीवरील रस्त्यांचे जाळे वाढले डांबरी रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढला
    -रात्रीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली
    -वर्दळीमुळे वन्यप्राण्यांच्या वावरावर निर्बंध आले
    -शेतातील उघड्या विहिरींमध्ये पडून बिबट्यांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय.

    Maharashtra TimesBhimashankar Temple: भाजप खासदाराच्या भीमाशंकर दर्शनाने वादंग; ‘पुरातत्त्व’च्या कामामुळे मंदिर बंद असतानाही दिलं VIP दर्शन
    राज्यातील पाच वर्षांतील बिबट्याचे मृत्यू
    २०२१ —१६७
    २०२२ —१४०
    २०२३ —७७
    २०२४ —१४४
    २०२५ —१३७
    २०२६ —१०
    (जानेवारी अखेर)

    -नैसर्गिक कारणांमुळे पाच वर्षांत ३२० बिबटे मरण पावले
    -रस्ता ओलांडतानासह विविध अपघातांत १९८ मृत्युमुखी
    -शिकारींमध्ये १७, तर विजेच्या धक्क्याने १२ बिबट्यांचा मृत्यू
    -राज्यातील बिबट्यांचे सर्वाधिक मृत्यू पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर
    -नाशिक, पाच वर्षांत १६१ बिबट्यांचा मृत्यू
    -वाघांपेक्षा बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण तिपटीहून अधिक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *