मराठवाड्यात शनिवार सकाळपर्यंत संपलेल्या २४ तासात १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांमध्ये मराठवाड्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २४ तासांमध्ये ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर दुसरीकडे सर्वाधिक पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला. नांदेड जिल्ह्यात ३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर हिंगोली जिल्ह्यात १७ मिलीमीटर १७ मिमी, जालना जिल्ह्यात ११ मिमी, परभणीत ८ मिमी तर बीड जिल्ह्यात ६ मिमी आणि लातूर जिल्ह्यात २ मिमी तर धाराशिवमध्ये १ मिमी पावसाची नोंद झाली होती.
मराठवाड्यात पावसाची मोठी तूट
मराठवाड्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात ओढ दिल्यानं मोठी तूट निर्माण झाली आहे. मराठवाड्यात ऑगस्टमधील पावसाची तूट ही ७७ टक्क्यांवर पोहोचली आहे. खरीप हंगामांच्या महत्त्वाच्या काळात पावसानं ब्रेक घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेंचं वातावरण निर्माण झालं होतं.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील शेतकरी सुभाष जोशी यांनी चांगला पाऊस झाला तर खरीप हंगामातील पिकं वाचतील असं म्हटलं. खरीप हंगामात यंदा पेरणीला मान्सूनचं आगमन लांबल्यानं उशीर झाला. तर, ऑगस्ट महिन्यातील कमी पावसामुळं पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात २३ ऑगस्टपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहता शेती वाचवण्यासाठी जर पाऊस सुरु नाही झाला तर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावं, अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जाऊ शकते.