याबाबत माहिती अशी, शनिवारी संध्याकाळी दहा जवानांसह लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडं जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ते वाहन दुपारी ४.४५ वाजता रस्त्यावरून घसरुन खोल दरीत कोसळले. या वाहनात कर्तव्यावर निघालेले दहा जवान होते. या दुर्घटनेत जवानांसह ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (जेसीओ) मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. ही घटना कळताच लष्कराकडून तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, या घटनेत आठ जवानांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघेजण जखमी झाले आहे. जखमी जवानांना तातडीनं फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
जवान वैभव भोईटे हे मूळ हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथील आहे. भोईटे यांना अपघातात वीरमरण आलं आहे. वैभव भोईटे हे ३११ आर्टिलरी रेजिमेंटमध्ये होते. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाख इथं आहे. त्यांची पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहे.
वैभव भोईटे हे ४ वर्षापूर्वीच अत्यंत कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर सैन्यात भरती झाले होते. त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी प्रणाली वैभव भोईटे या सातारा पोलीस दलात दहिवडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. त्यांना एक दीड वर्षाची लहान मुलगी आहे. एक लहान भाऊ विशाल, वडील संपत भोईटे, आई बेबीताई भोईटे, दोन चुलते विलास भोईटे (जेलर अधिकारी), मोहन भोईटे, दोन विवाहित बहिणी नीलम आणि प्रिया असा परिवार आहे.
या दुर्घटनेत जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये राजाळे येथील वीर जवान वैभव भोईटे यांचा समावेश असल्याचे वृत्त गावकऱ्यांना कळाले. देशासाठी गावचा वीर शहीद झाल्याच्या अभिमानाने सर्वांची छाती अभिमानाने भरुन आली. मात्र, तरुण वयातच सुपुत्र गमावल्याचे दुःखही असल्याने राजाळे गावावर शोककळा पसरली आहे. राजाळे गावाने या घटनेमुळे आजपासून अंत्यविधी होईपर्यंत व्यापारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहीद जवान वैभव भोईटे यांचे पार्थिक गावी कधी येणार आहे, याबाबत माहिती मिळू शकली नव्हती.