• Wed. Mar 18th, 2026

    Mumbai Crime : जादूटोण्याच्या संशयावरुन नवऱ्याने बायकोला संपवलं, Video कॉल करुन मुलाला दाखवली आईची बॉडी; मुंबईतील घटना

    Mumbai Crime : जादूटोण्याच्या संशयावरुन नवऱ्याने बायकोला संपवलं, Video कॉल करुन मुलाला दाखवली आईची बॉडी; मुंबईतील घटना

    Mumbai Crime News : बुधवारी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शिवराम वडिलांना घेण्यासाठी घरी पोहोचला. घर आतून बंद होते आणि वारंवार हाक मारूनही प्रतिसाद मिळत नव्हता.

    धारावी महिलेची हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका 58 वर्षीय भंगार विकणाऱ्याने आपल्या बायकोची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बायको आपल्यावर जादूटोणा करते, या संशयातून नवऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून गुन्ह्याची कबुली दिली.

    ‘मी तुझ्या आईला मारून टाकीन’

    आरोपी अमृत मेघा सोलंकी (वय 58) हा धारावी कोळीवाडा येथील जांबा पास्कल चाळीत आपली पत्नी सूरजबेन सोलंकी (वय 52) सोबत राहत होता. 13 मार्च शुक्रवारी रोजी दुपारी 2:30च्या सुमारास ही घटना घडली. अमृतने पत्नीच्या डोक्यात पाण्याची बॉटल मारून आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यांचा मुलगा शिवराम सोलंकी (वय 33) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडील गेल्या तीन वर्षांपासून आईचा छळ करत होते. ‘आई आणि मुले मिळून माझ्यावर जादूटोणा करतात आणि मुले फक्त आईलाच साथ देतात,’ असा अमृतचा समज होता. त्याने आपल्या मुलांना घरात येण्यासही बंदी घातली होती. 11 मार्च बुधवारी रोजी झालेल्या एका वादात अमृतने ‘एके दिवशी मी तुझ्या आईला मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली होती.

    रक्ताच्या थारोळ्यात बायकोची बॉडी

    11 मार्च बुधवारी रोजी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शिवराम वडिलांना घेण्यासाठी घरी पोहोचला. घर आतून बंद होते आणि वारंवार हाक मारूनही प्रतिसाद मिळत नव्हता. शिवरामने वडिलांना फोन केला असता, अमृतने व्हिडिओ कॉल उचलण्यास सांगितला. व्हिडिओ कॉल सुरू होताच शिवरामच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे वडील रक्ताने माखलेले होते. अमृतने कॅमेरा फिरवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बायकोची बॉडी दाखवली आणि मोठ्यानं सांगितलं की, ‘सगळ्यांना बोलव, मी तुझ्या आईला बाटलीने मारून आणि गळा दाबून संपवलं आहे.’

    शिवरामचा आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सूरजबेन यांना सायन रुग्णालयात नेलं, मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अमृत सोलंकीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा