साहाय्यक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा सर्व तपास झाला आहे. सुरुवातीला अल्फान्सो या तपास अधिकारी होत्या. त्यांची बदली झाल्यानंतर गृहविभागाने त्यांच्यावर या हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी कायम ठेवली होती. तत्कालिन साहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड, नीलेश राऊत यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर, शुक्रवारपासून संगीता अल्फान्सो यांची साक्ष पनवेल न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर सुरू झाली.
अल्फान्सो यांनी या खटल्यात २०१७मध्ये केलेल्या तपासाबाबत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांची सरतपासणी घेतली. यावेळी न्यायालयात मुख्य आरोपी कुरूंदकर याच्यासह राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे हजर होते. ही सरतपासणी आणखी दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरोपींचे वकील विशाल भानुशाली आणि प्रसाद पाटील हे अल्फान्सो यांची उलटतपासणी घेणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयात सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या घटनाक्रमांचा होणार उलगडा
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणाचे तपास अधिकारी वेगवेगळे असले, तरी साहाय्यक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी सुरुवातीपासून या गुन्ह्याचा तपास केला आहे. तसेच त्यांनी सर्वच महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्यांनी केलेल्या सखोल तपासामुळे कुरूंदकर आणि अन्य आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या सर आणि उलटतपासणीमध्ये या हत्याकांडातील घटनाक्रमांचा उलगडा होणार आहे. त्यामुळे त्यांची साक्ष या खटल्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.