मुंबई: राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे गटाचे नेते टाळ्या वाजवत आहेत, आनंदी असल्याचे दाखवत आहेत. मात्र, माझी माहिती अशी आहे की, अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळू नये म्हणून शिंदे गट दिल्लीत गेला होता. पण दिल्लीत त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. तेव्हा दिल्लीत भाजप नेतृत्वाकडून त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, तुम्हाला राहायचं तर राहा, नाहीतर जाऊ शकता. तसेच दिल्लीत शिंदे गटासमोर आणखी एक प्रस्ताव ठेवण्यात आला. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद द्यायचे नसेल तर शिंदे गटाने ते स्वत:कडे ठेवून घ्यावे. मात्र, त्या मोबदल्यात मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना द्यावे. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर शिंदे गट दिल्लीतून माघारी आला आणि अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली, ही माझी पक्की माहिती असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती!संजय राऊत यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर शिंदे गट किंवा अजित पवारांच्या गटाकडून कोणते स्पष्टीकरण देण्यात येणार का, हे पाहावे लागेल. मात्र, अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळाल्याने शिंदे गटात तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झाले होते. शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी तेव्हा अजित पवार यांच्यावर बेछूट आरोप केले होते. मात्र, आता अर्थमंत्रीपद पुन्हा अजित पवार यांच्याकडेच आल्याने शिंदे गटाचे आमदार त्यांच्याकडे निधीची मागणी करताना परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जातात, हे बघावे लागेल.
Maharashtra Cabinet Expansion: अजित पवारांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ
एकनाथ शिंदे यांची शिवसेना गेल्या वर्षभरापासून भाजपसोबत आहे. मविआचे सरकार उलथवून भाजपला सत्तेत आणण्यात एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र, आता नव्याने सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांच्या गटाला खातेवाटपात महत्त्वाची खाती मिळाली आहेत. एवढेच नव्हे तर शिंदे गटाच्या विरोधाची तमा न बाळगता अर्थमंत्रीपदही अजित पवार यांच्याकडे देण्यात आली होती. आगामी काळात अजित पवार यांच्याकडून अर्थखात्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या आमदारांना आर्थिक रसद पुरवली जाईल. या सगळ्यातून शिंदे गटातील आमदारांच्या वाट्याला कितपत निधी येणार, हा एक प्रश्नच आहे.
तिजोरीच्या चाव्या अजित दादांच्या हाती, एकनाथ खडसेंनी शिंदेंना डिवचलं