अकोल्यातील डाबकी रोड परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अकोला पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास डाबकी रोड रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मृत माविश हा एका चहाच्या टपरीवर उभा असताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य काही तरुणांशी त्याचा शाब्दिक वाद झाला. आरोपींनी “तू माझ्याकडे का पाहतोस?” असे म्हणत माविशशी हुज्जत घातली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी माविशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने धारदार चाकू काढून माविशवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माविशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांची जलद कारवाई
घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे, आरोपी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मार्गे मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून अवघ्या ६ तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
Pune News : 11 महिन्यांचा संसार, वेगवेगळ्या देशात नोकरी, जोडपं पुणे कोर्टात, लग्न जुळवणाऱ्या माऊलींनीच घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या घटनेचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शहरात शांतता राखावी.”
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींची पार्श्वभूमी तपासली जात आहे.
