• Thu. Mar 19th, 2026
    मंदिरात दर्शन घेऊन परतताना घात, सांगलीतील शिक्षण संस्था संचालकाला घराजवळ संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

    Sangli Sanjay Paranjape killed : ​​हल्लेखोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांनी मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना गाठून हे कृत्य केले असावे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली : पलुस शहरात गुरुवारी रात्री एका ज्येष्ठ शिक्षण संस्था संचालकाचा त्याच्याच घराजवळ निर्घृण खून झाल्याच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. परांजपे हे पलूसमधील कुंडल वेस भागातील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून, हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे त्यांच्यावर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तातडीने धाव घेत तपासचक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे.

    नेमकं काय घडलं?

    संजय परांजपे हे घटनेच्या वेळी आपल्या कुटुंबासमवेत घरीच बसले होते. काही वेळानंतर ते अचानक उठले आणि इमारतीच्या खाली असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी इमारतीच्या खाली धाव घेतली असता, परांजपे यांचं शव रक्ताने माखलेलं दिसून आलं. हे भीषण दृश्य पाहताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.
    Maharashtra TimesPune Friends Death : लेह-लडाखहून परत येताना काळाचा घाला, पुण्यातील तीन मित्रांचा अपघाती अंत, विमानाने परतलेला दोस्त धक्क्यात

    पाळत ठेवून हल्ल्याचा संशय

    हल्लेखोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवूनच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यांनी मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना गाठून हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच कुंडल वेस परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिसराची नाकाबंदी केली.

    गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या शुभेच्छा; नागपूर शोभयात्रेत सहभागी होत लुटला आनंद

    शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव

    रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते. संजय परांजपे हे शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या हत्येच्या बातमीने शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधाला विरोधातून नात्यातील तरुणाने संपवलं, 22 वर्षीय आरोपी अटकेत
    परांजपे यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी संशयितांची धरपकड करण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून, लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेमुळे परांजपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पलूस शहर या घटनेने सुन्न झाले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा