मुंबई: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या पाऊस कधी येणार, या प्रश्नाला या आठवडाखेरीस उत्तर मिळण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील बऱ्याचशा भागात मान्सूनचा पाऊस येणार असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामुळे उकाड्यातूनही सुटका होण्याची आशा आहे.मुंबईत या आठवड्याची सुरुवात प्रचंड उकाड्याने झाली. कुलाबा येथे ३३.७ तर सांताक्रूझ येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.२ अंशांनी अधिक होते. मात्र होणारी जाणीव प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक असल्याचे निरीक्षण मुंबईकरांनी नोंदवले. त्यामुळे पाऊस कधी येणार, अशी सातत्याने विचारणा होत आहे. यासाठी आता परिस्थिती अनुकूल होत असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण भारतासोबत मध्य भारतातील बऱ्याचशा भागात मान्सूनचा पाऊस पडू शकेल.
जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. या काळात देशासाठी चांगली स्थिती निर्माण होईल, असेही ते म्हणाले. सध्या पावसाची सरासरी ही मोठ्या प्रमाणावर तुटीची आहे. त्यामुळे पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, असेही होसाळीकर यांनी सांगितले.

शेतकरीही पावसाच्या आगमनाची वाट पाहत असल्याने पावसाची आकडेवारी, पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पेरणीसाठी घाई करू नये, असाही सल्ला देण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या भागामध्ये ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीयोग्य वातावरण निर्माण होते. मात्र या आकडेवारीसोबतच स्थानिक जमिनीचा कसही लक्षात घेऊन पेरणी करावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.
पावसाचे वितरण
दक्षिण कोकण बहुतांश ठिकाणी- ७६ ते १०० टक्के
उत्तर कोकण अनेक ठिकाणी- ५१ ते ७५ टक्के
दक्षिण मध्य महाराष्ट्र विरळ- २६ ते ५० टक्के
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व-पश्चिम विदर्भ तुरळक- १ ते २५ टक्के