• Mon. Nov 25th, 2024
    ठाकरे गटाकडील विरोधी पक्षनेतेपद धोक्यात, पण मविआच्या एकजुटीसाठी राष्ट्रवादीचा दिलदारपणा?

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कायदे यांच्या पक्षांतरामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटातील आमदारांची संख्या कमी झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीतील एकजूट अभेद्य राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

    का बदलली परिस्थिती?

    मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत विदर्भातील विप्लव बजोरिया हे विधान परिषदेतील एकमेव आमदार होते. मनीषा कायंदे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ ११ वरून नऊपर्यंत खाली आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा विधान परिषदेचे सदस्य आहेत. शिवाय, माजी परिवहनमंत्री अनिल परब हे ठाकरे गटाचे प्रतोद आहेत. मराठवाड्यातील अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. सध्या देशभरातील वातावरण पाहता ठाकरे गटाचे हे पद काढून घेण्याचा दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते विचार करणार नाहीत, असे मानले जात आहे.

    जास्त बोलात तर नांगरुन टाकेन, शेतीचं उदाहरण देत उद्धवजींनी ठाकरीबाणा दाखवला

    सगळे खोके कुठे गेले हे एक दिवस जनतेसमोर यईल, CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा

    ‘निर्णय वरिष्ठ नेत्यांवर’

    ‘महाविकास आघाडीत एकजूट राहावी, यासाठी तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. आताचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आमची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. वरच्या सभागृहामध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. आता नवी संख्या किती आहे यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या प्रश्नावर स्पष्ट केले. ‘तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर विचार निश्चित करू,’ असे मिश्कील भाष्यही अजित पवार यांनी केले. तथापि, ‘विरोधी पक्षनेते बदलण्याचा कोणताही विचार नाही, हा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे ‘राष्ट्रवादी’च्या एका नेत्याने सांगितले.

    बदलत्या परिस्थितीत विधान परिषदेत विरोधी पक्षनेता कोण याचा आम्ही कधीच विचार केलेला नाही. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

    – अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

    महाविकास आघाडीत सामंजस्य आहे. आमच्यात एकवाक्यता आहे. याबाबतचा निर्णय एकत्र बसून घेऊ. मात्र, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद आमच्याकडेच राहील.

    – संजय राऊत, नेते, ठाकरे गट

    विधान परिषदेतील पक्षीय बलाबल

    भाजप – २२

    रिक्त जागा – २१

    राष्ट्रवादी काँग्रेस – ९

    ठाकरे गट – ९

    शिवसेना – २

    काँग्रेस – ८

    अपक्ष – ४

    (संयुक्त जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष प्रत्येकी १)

    एकूण – ७८

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *