‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर अजितदादांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अण्णा बनसोडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र प्रवास केला. अण्णा बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आले आहे. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरुन पिंपरीतील एकटेच आमदार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे यांच्या जवळ असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिल्याने पुन्हा चर्चांना तोंड फुटले आहे.
अण्णा बनसोडे हे भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा देखील रंगली असून याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. अण्णा बनसोडे हे जवळचे असल्याचंही ते म्हणाले. तर अण्णा बनसोडे यांनी देखील ही निव्वळ सदिच्छा भेट म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णा बनसोडे हे एकत्र आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून भविष्यात पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भूकंप होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.