Accident News: शिर्डी-नाशिक महामार्गावरील सावळीविहीर येथे एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबीन खान, शिर्डी: शिर्डी-नाशिक महामार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. सावळीविहीर हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून शिर्डीकडे येणारी एसटी बस आणि नाशिकच्या दिशेने जाणारी एर्टिगा कार यांच्यात हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. तसेच एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर मदतकार्यासाठी धावपळ
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या अपघातात मृत झालेल्या दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकला असावा, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.
Abhishek Banerjee हल्ला प्रकरणाला नवं वळण; अटक केलेले आरोपी TMCचेच? पक्षाच्या आमदाराशी कनेक्शन समोर
वाहतुकीवर परिणाम, कोंडीची स्थिती
अपघातानंतर काही काळ शिर्डी-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुर्घटनाग्रस्त वाहनांमुळे रस्त्याच्या एका बाजूला मोठी कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटविण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
तसेच अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना दूर ठेवत मदतकार्य सुरळीतपणे पार पाडले.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची नोंद शिर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा