• Tue. Sep 8th, 2026

Thane Dombivli News :गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना त्या आधीच दिवाळीची लगबग ठाणे आणि डोंबिवलीत सुरु झाली आहे. सीमेवरील सैनिकांना दिवाळीनिमित्त फराळ पाठविण्याचा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,ठाणे:दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे आणि डोंबिवली शहरांतून सीमेवरील सैनिकांना दिवाळीनिमित्त फराळ पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. अतिशय दुर्गम भागातील सीमेवरील चौक्यांपर्यंत फराळ व्यवस्थित पोहोचावा, म्हणून त्याचे नियोजन सुरू झाले आहे. डोंबिवलीतील नमस्ते शौर्य फाऊंडेशनतर्फे यंदा १२ हजार, तर ठाण्यातील नाना साठे प्रतिष्ठानतर्फे दोन हजार सैनिकांना फराळाचे संच पाठवले जाणार आहेत.

सैनिकांप्रती कृतज्ञता

दिवाळीचा आनंद साजरा करत असताना देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या भावनेतून हा उपक्रम राबवला जातो. डोंबिवलीतील नमस्ते शौर्य फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने गेली आठ वर्षे सैनिकांना दिवाळी फराळ पाठवला जातो.

यंदा आठवे वर्ष

या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या सीमावर्ती भागांतील सैनिकांना फराळाचे संच दिले जातात. यंदा तवांग (अरुणाचल प्रदेश), कुपवाडा (काश्मीर), जम्मू, द्रास (कारगिल) आणि सियाचेन येथील १२ हजार सैनिकांपर्यंतदिवाळी फराळपोहोचविण्याचा प्रयत्न संस्था करणार आहे. त्याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. चकली, चिवडा आणि पौष्टिक लाडू या पदार्थांचा फराळ संचात समावेश आहे.

हजार जवानांना फराळ पाठवला जाणार

ठाण्यात नाना साठे प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ पाठवला जातो. गेली सलग तीन वर्षे संस्था हा उपक्रम राबवत असून यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. संस्थेतर्फे यंदा सहा ते सात सैनिकी तळांवरील दोन हजार जवानांना फराळ पाठवला जाणार आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe: चेहरा गोरा करण्यासह विविध उत्पादने निकृष्ट; पण कारवाई करण्यात FDA समोर एक मोठा अडथळा, तुकाराम मुंढे काय म्हणाले?

श्रमदान

विशेष म्हणजे हे दोन्ही उपक्रम लोकसहभागातूनराबवले जातात. दर वर्षी या उपक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. नागरिक यथाशक्ती देणगी देतातच; परंतु फराळाचे संच भरणे, ते विशिष्ट ठिकाणी पोहोचवणे आदी कामांसाठी श्रमदानही करतात.

संपर्क : नाना साठे प्रतिष्ठान : कौस्तुभ साठे- ९८३३१०९३९८

नमस्ते शौर्य फाउंडेशन : कुणाल सुतावणे- ९८१९५०४०२०.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा