बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मारहाणीच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी अशा घटना करणाऱ्यांवर मकोकाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला. त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर नजर ठेवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी नियम सर्वांसाठी समान असल्याचे ठामपणे सांगितले.
“मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. मी पोलिसांना सांगितलं, कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहिलं तर मी मोकको लावीन”, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
‘त्यांना शरम कशी वाटत नाही’
“आपली मुलं काय करत आहेत हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा”, असं अजित पवार यांनी बजावलं.Baramati News : वाद टोकाला गेला आणि भर चौकात तरुणाला संपवलं, हत्येच्या घटनेने बारामतीमध्ये खळबळ
“बारामतीत विकास कामे करतो आहे पण काही जण वेडेवाकडेपणा करतात. एक जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते. पोलिसांना जप्त करायला सांगितलं आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार हे शिस्तप्रिय नेते आहेत. त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली तर ते तोंडावर बोलतात. तसेच एखाद्या अधिकाऱ्याने कामावर कसूर केली आणि ती त्यांच्या लक्षात आली तर ते उघडपणे अधिकाऱ्यांचे कान टोचतात. त्यांच्या या रोखठोक स्वभावाचं आजच्या कार्यक्रमातही दर्शन झालं.