• Sat. Mar 14th, 2026

    महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देऊन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा –  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 11, 2026
    महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देऊन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा –  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी  – महासंवाद

    नागपूर, दि.11 : ग्रामीण भागासह शहरी भागातील महिलांना मिळालेला विकासाचा मार्ग म्हणून उमेदकडे आपल्याला पाहता येईल. मुंबईच्या खालोखाल महिला बचत गटांसाठीचा सर्वात मोठा महोत्सव म्हणून नागपूर येथे होणाऱ्या या उमेद महोत्सवाकडे पाहिले जाते. केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या लखपती दीदींना अधिक शाश्वतेचे मार्ग उमेदमार्फत मिळाले असून नागपुरकरांनी रेशीमबाग येथे सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देऊन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

    रेशीमबाग मैदानावर आयोजित भव्य राज्यस्तरीय  महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी महापौर श्रीमती नीता ठाकरे, महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून प्रयत्नरत असलेल्या श्रीमती कांचन गडकरी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,  उमेद अभियानाचे मुख्य परिचलन अधिकारी, निखिल ओसवाल, अपर आयुक्त विवेक इलमे, अपर आयुक्त वर्षा गौरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक अंशूजा गराटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कलोडे, सौ. सविता मते आदी मान्यवर  उपस्थित होते.

    ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सर्वसमावेशक लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करण्याचे काम उमेद  अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यात उमेदअंतर्गत आजवर सुमारे 6 लाख 70 हजार एवढे स्वयंसहाय्यता समुह तर सुमारे 34 हजार 300 ग्रामसंघ केवळ महिलांसाठी कार्यरत आहेत. यात सुमारे 2 हजार प्रभाग संघ असून जवळपास 65 लाख 7 हजार 568 एवढ्या महिला सदस्या या चळवळीतून आत्मविश्वासाने पुढे आल्या आहेत, असे प्रतिपादन उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले.

    प्रत्येक स्त्री जवळ सुप्त कलागुण असतात. काही कौशल्य असतात. या कौशल्य व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. लखपती दीदीची योजना ही यादृष्टीने खुप मोलाची आहे. महिलांनी आता अधिक सकारात्मक दृष्टीकोन बाळगून स्वयंपुर्णतेसाठी पुढे आले पाहिजे. सरस हे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध असून अनेक सखींना यातून रोजगार उपलब्ध झाल्याचे कांचन गडकरी यांनी सांगितले.

    अधिकाधिक महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी होता यावे यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. समाजाच्या विकास प्रवाहातील अर्धा भाग महिला समर्थपणे पेलु शकतील. नागपूर महानगरातील महिला पुढे याव्यात यासाठी महानगरपालिका येत्या काळात व्यापक प्रमाणात योगदान देणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आदिशक्ती ते नारीशक्ती हे अभियान हाती घेत असल्याचे सूतोवाच महापौर निता ठाकरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी महिलांशी संवाद साधला.

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत भूमिका सांगून जिल्ह्यातील महिलांनी अधिकाधिक संख्येने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.

    सर्व महिला हिरकणी, जिजाऊ आणि पृथ्वीतलावरच्या खऱ्या अप्सरा माझ्या बचत समूहातील महिला आहेत. कलाकार म्हणून, एक स्त्री म्हणून माझ्याकडून समाजासाठी जे काही देणे लागत त्यासाठी मी प्रयत्न करते. महालक्ष्मी सरस सारखे बाजारपेठेचे मोठे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिले हेच उमेद अभियानाचं यश असल्याचे मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व  जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदान नागपूर येथे आयोजित हे राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन दिनांक 23 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

    00000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed