राज्यात LPG गॅस सिलेंडरसाठी अनेक शहरांमध्ये रांगा लागल्याचं बघायला मिळत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण व्यवस्था नियमितपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशात घरगुती एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन आणि ब्यूटेन यांसारख्या घटकांचा वापर प्राधान्याने एलपीजी उत्पादनासाठी करून तो सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना – इंडियन ऑईल (आयओसीएल ), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल ) उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या एलपीजीचा पुरवठा प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसाठी करण्यात येणार आहे.
घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांसारख्या अत्यावश्यक गैर-घरगुती क्षेत्रांनाही आवश्यकतेनुसार एलपीजी पुरवठा करण्यात येणार आहे. इतर गैर-घरगुती क्षेत्रांच्या मागण्यांचे परीक्षण करून प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
तर विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना घरगुती एलपीजी गॅसच्या सुरळीत वितरणासाठी तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हास्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून तपासण्या करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरगुती गॅसचे वितरण नियमित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासही सांगितले आहे.
या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन अनावश्यक सिलिंडर साठा करण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन व तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांना मागणीनुसार सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आवश्यक तेवढ्याच प्रमाणात एलपीजीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा