• Fri. Mar 13th, 2026

    सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यांच्या कामांना गती द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 11, 2026
    सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यांच्या कामांना गती द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद

    मुंबई, दि. ११ :- राज्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरची ओळख असून दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देतात. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि आरामदायी व्हावा यासाठी सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

    सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या  बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), रस्ते विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाचे रणजित हांडे, उपसचिव शैलेश बोरसे, सातारा येथील कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, पाचगणी–महाबळेश्वर, सुरूर–वाई तसेच पोलादपूर–महाबळेश्वर या मार्गांवरील कामे वेगाने आणि उच्च दर्जाची आणि वेळेत पूर्ण करण्यात यावीत. या मार्गांवर अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. त्यामुळे रस्त्यांचे काम नियोजनबद्ध पद्धतीने आणि जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.

    हा मार्ग डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या परिसरातून जात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घाटमार्गातील वळणे, उतार तसेच संवेदनशील ठिकाणे लक्षात घेऊन रस्त्याचे योग्य रुंदीकरण करावे, आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत आणि वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता येईल अशी व्यवस्था निर्माण करावी, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निर्देश दिले.

    महाबळेश्वर परिसरात वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असल्याने रस्त्यांची कामे करताना टिकाऊपणा आणि गुणवत्तेचा  विचार  संबंधित यंत्रणेने करावा. पावसाळ्यात रस्ते खराब होऊ नयेत यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत आणि दर्जेदार बांधकाम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

    या रस्त्यांच्या कामांमुळे पाचगणी, वाई, महाबळेश्वर आणि पोलादपूर या पर्यटनस्थळांमधील संपर्क अधिक सुकर होणार असून पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल. तसेच स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासालाही मोठा दिलासा मिळणार आहे. महाबळेश्वर आणि आसपासच्या परिसरातील पर्यटनाला अधिक चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील बळकटी मिळेल, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

    0000

    अश्विनी पुजारी/स.सं

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed