• Sun. Mar 8th, 2026

    हरभरा काढणीवेळी बाबांचा फोन, हात अडकला अन् तो मशीनमध्ये ओढला गेला, तरुणाचा अंत पाहून गाव सुन्न

    हरभरा काढणीवेळी बाबांचा फोन, हात अडकला अन् तो मशीनमध्ये ओढला गेला, तरुणाचा अंत पाहून गाव सुन्न

    Nagpur Labor Died After Stuck In Harbhara Kadhani Machine In Kamptee

    Lipi

    जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे हरभरा काढणीच्या कामादरम्यान एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हरभरा कापणीच्या यंत्रात हात अडकल्याने तो मशीनमध्ये ओढला गेला आणि यात त्याचा जागीच अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. साहिल सूरज देशमुख (२५, रा. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना पाहून गावातील प्रत्येकजण हादरला आहे.

    वडिलांचा फोन अन् हात मशीनमध्ये अडकला

    लिहिगाव येथील शेतकरी अशोक बालाजी धुडस यांच्या शेतात हरभरा काढणीचे काम सुरू होते. साहिल देशमुख हा मजूर म्हणून हरभरा कापणीच्या मशीनवर काम करत होता. शनिवारी दुपारी तो मशीनमध्ये हरभरा टाकत असताना त्याच्या वडिलांचा फोन आला. फोनवर बोलताना त्याचा हात अचानक मशीनमध्ये अडकला आणि संपूर्ण शरीर आत ओढले गेले. हरभरा यंत्रात अडकल्याने या मजुराच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

    या भयंकर घटनेची माहिती मिळताच मशीन मालक अरविंद सांभारे यांनी तातडीने मदतीसाठी लोकांना बोलावले. गॅस कटर ऑपरेटरच्या सहाय्याने मशीन कापून साहिलला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला त्वरित कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिथे त्याला तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह बांदी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.

    या दुर्घटनेनंतर साहिलच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्यात मृतकाचे सहकारी मनोज बिहारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ही घटना मजुरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी यंत्रांवर काम करणाऱ्या मजुरांना योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनं उपलब्ध करून देण्याची गरज आहे, हे पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed