• Sat. Sep 5th, 2026

Dahi Handi 2026: दहीहंडीवेळी धक्का लागण्यावरून युवकांमध्ये राडा; पोलिसांनी दोघांना बाहेर काढले, डीजेच्या आवाजातही नियमांची चर्चा

नागपूर : नागपूरच्या बडकस चौकात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीवेळी उत्साहाचे वातावरण असतानाच कार्यक्रमाच्या अखेरीस काही युवकांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच मारामारीत झाले. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत दोन युवकांना कार्यक्रमस्थळाबाहेर काढले, तर इतर युवकांना तेथून हाकलून लावले. कार्यक्रम संपत असताना ही घटना घडली. या प्रकरणात संबंधित युवकांविरोधात पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या उत्सवाची आणखी एक चर्चा झाली ती म्हणजे डीजेच्या वापराची. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वापराबाबत निर्बंध घातले असताना बडकस चौकातील दहीहंडीमध्ये डीजे वाजवण्यात आला. मात्र, दरवर्षीप्रमाणे मोठ्या आवाजात डीजे न वाजवता निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करूनच डीजे सुरू ठेवण्यात आल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. पोलिसांनीही आवाजाची मर्यादा पाळण्याच्या अटीवर डीजेला परवानगी दिल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, या दहीहंडी कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे बडकस चौकातील दहीहंडी कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागले होते. गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी सहभाग घेतला आणि परिसरात मोठी गर्दी झाली.

दरम्यान, कार्यक्रम सुरू असताना डीजेचा आवाज परिसरात ऐकू येत होता. मात्र, आयोजकांनी आवाजाची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडूनही कार्यक्रमस्थळी ध्वनीपातळीवर लक्ष ठेवण्यात आले. संध्याकाळी सातच्या सुमारास ध्वनीपातळी सुमारे 80 ते 82 डेसिबल इतकी नोंदवल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमस्थळी लेझर आणि तीव्र प्रकाशाच्या लाईट्सचाही वापर झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून नियमांचे उल्लंघन होत नाही ना, याची पाहणी केली.

याच दरम्यान कार्यक्रम संपत असताना काही युवकांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर अचानक मारामारी सुरू झाली. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन युवकांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळाबाहेर काढले, तर इतरांना तेथून हुसकावून लावण्यात आले. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनुचित प्रकार टळला.

दरम्यान, ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या इतर दहीहंडी मंडळांवर पोलिसांकडून कारवाईची शक्यता असून, संबंधित मंडळांना नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बडकस चौकातील दहीहंडीमध्ये डीजे वाजला असला तरी तो नियमांच्या चौकटीत होता का, याकडे आता लक्ष लागले आहे.