नाशिक, दि. ५ (जिमाका): कळवण तालुक्यातील आश्रमशाळेमधील काही विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी कळवण उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. उपचार घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आवश्यक ते उपचार सुरू ठेवण्याच्या तसेच आवश्यक चाचण्या करून घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यातील काही शासकीय आश्रमशाळांमधील एकूण ३४ विद्यार्थी उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. यामध्ये विसापूर येथील २५, नवीबेज येथील ५, साल्हेर येथील १, मानूर येथील २ आणि काठरेदिगर येथील १ याप्रमाणे विद्यार्थ्याचा समावेश आहे. या पाच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. तापाचे प्रमाण कमी झाले असून, पुढील दोन दिवस विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

पालकमंत्री महाजन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना झालेला आजार व्हायरल इन्फेक्शनशी संबंधित असल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे. नाशिक येथील वैद्यकीय पथक कळवण येथे दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येईल. मृत सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा, औषधे आणि उपचार वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिका, रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल. सेंट्रल किचनची व्यवस्था, अन्नाची गुणवत्तेची तपासणी अन्न व औषध प्रशासनामार्फत करून घेण्यात येईल.
आश्रमशाळांमधील व्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, याप्रकरणी तीन जणांचे निलंबन करण्यात आले आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारची अव्यवस्था होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, बालरोग तज्ञ डॉ. जनक पूरकर, डॉ. पांडुरंग जाधव, डॉ. कमलाकर जाधव, डॉ. सागर गवळी, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री महाजन यांनी विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.
०००