• Sat. Sep 5th, 2026

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस आयुक्तांचे कठोर आदेश, उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर: विमान प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरासह विमानतळाच्या १५ किलोमीटरच्या परिसरात प्रखर लेझर लाईट्स आणि बीम लाईट्स आकाशात सोडण्यास किंवा वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

भारतीय विमानपतन प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते की, विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालयांमधील लग्नसोहळे तसेच विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आणि सण-उत्सवांमध्ये आकाशात प्रखर लेझर व बीम लाईट्सचा वापर केला जातो. विमानाच्या टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी हे प्रखर किरण वैमानिकांच्या डोळ्यांवर पडल्याने त्यांची दृष्टी बाधित होते व लक्ष विचलित होते.

पोलीस आयुक्तांच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे:

– बंदीचा परिसर: छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या १५ किलोमीटर वायुक्षेत्र परिघात आणि संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात.

कशावर बंदी?

लग्नसोहळे, सामाजिक, धार्मिक किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात आकाशात प्रखर लेझर लाईट्स आणि बीम लाईट्स सोडण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

अंमलबजावणीचा कालावधी

हे आदेश ४ सप्टेंबर २०२६ (मध्यरात्री ००:०१ पासून) ते २ नोव्हेंबर २०२६ (दुपारी १२:०० वाजेपर्यंत) म्हणजेच ६० दिवसांसाठी अंमलात राहतील.

दरम्यान, या सुधारीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा आयोजकांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल.

नागरिकांना आणि आयोजकांना आवाहन

विवाहसोहळे, सण-उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी व डीजे/लाईट व्यावसायिकांनी लेझर लाईट्सचा वापर टाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे व उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed