• Sat. Sep 5th, 2026

डिजिटल युगातील बदलांशी शिक्षकांनी अद्ययावत राहावे -पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 5, 2026

धुळे, दि. (जिमाका) : डिजिटल शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. या बदलांशी शिक्षकांनी सातत्याने अद्ययावत राहून नवे ज्ञान आत्मसात करावे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रभावी वापर करावा. बदलत्या जगातील आव्हाने आणि संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांची आहे, असे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, धुळे यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैभव वाचकर, प्राचार्या सुचेता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले, शिक्षकाचे कार्य केवळ पुस्तकातील ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणे, त्यांच्यात मूल्ये रुजविणे आणि त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मूर्तिकार जसा दगडाला पैलू पाडून मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना पैलू पाडून त्यांचे भविष्य घडवतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत आई-वडिलांप्रमाणे गुरूलाही अत्युच्च स्थान आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची विशेष जबाबदारी शिक्षकांवर आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशातील मोठ्या संस्थांमध्ये नेतृत्व करत आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्याला घडविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मुला-मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व अन्य उपलब्ध निधींच्या माध्यमातून शाळांच्या सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील. धुळे हा आकांक्षित जिल्हा असून शिक्षणाच्या गुणवत्तेत जिल्ह्याला राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांच्या बरोबरीनेच नव्हे, तर त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शिक्षकांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक दिनानिमित्त भारताचे माजी राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करत मंत्री रावल यांनी भारताच्या प्राचीन गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण केले. प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक शैक्षणिक वर्ष हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील नवा अध्याय असल्याने त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याबरोबरच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना मंत्री रावल म्हणाले, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संपूर्ण शिक्षकवर्गाच्या योगदानाचा प्रातिनिधिक गौरव आहे. पुरस्कारानंतर समाजाच्या अपेक्षांसोबत जबाबदारीही वाढते. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपल्या कार्यातून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा. चांगले विद्यार्थी घडले तर चांगले नागरिक घडतील आणि त्यातून राज्य व देशाच्या प्रगतीसह विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. धुळे जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेत उच्च भरारी मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार – आमदार राघवेंद्र पाटील

यावेळी आमदार राघवेंद्र पाटील म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्यावर संस्कार करून सक्षम व जबाबदार पिढी घडवितात. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांच्या योगदानातूनच समाज आणि राष्ट्राची प्रगती घडते. त्यामुळे शिक्षक हे खऱ्या अर्थाने समाजाचे शिल्पकार आहेत, असे त्यांनी सांगितले.

यांना प्रदान करण्यात आला ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’

◆ श्रीमती चंद्रकला परदेशी

जिल्हा परिषद शाळा, चौगाव, ता. धुळे

◆ दिनेश धनगर

जिल्हा परिषद शाळा, नरडाणा स्टेशन, ता. शिंदखेडा

◆ श्रीमती मुब्बशेरा खान

जिल्हा परिषद उर्दू शाळा, पिंपळनेर, ता. साक्री

◆ चंपालाल पाटील

जिल्हा परिषद शाळा, लौकी, ता. शिरपूर

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed