• Fri. Jan 3rd, 2025
    Success Story: कर्तव्यकठोर सॉलोमन बनला अधिकारी! हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या जवानाची प्रेरणादायी यशोगाथा

    Success Story: सॉलोमन हे मूळचे मणिपूरच्या सुग्नू चांडेल जिल्ह्यातील मोल्नोई गावातील असून, त्यांचे वडील मणिपूर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

    महाराष्ट्र टाइम्स
    सॉलोमन

    मुंबई : दीड वर्षांपूर्वी मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घर, जीव वाचवण्यासाठी जवळच्या डोंगरात आश्रय घेतलेले जीवलग अशा प्रतिकूल परिस्थितीत सैन्यात कार्यरत राहण्याची कर्तव्यकठोरता कायम राखत १५ आसाम रेजिमेंटच्या एका जवानाने आर्मी कॅडेट कॉलेजची (एसीसी) परीक्षा उत्तीर्ण करण्याची कामगिरी केली आहे. सॉलोमन, असे या जवानाचे नाव असून, आता ते अधिकारीपदाचे प्रशिक्षण घेऊन रेजिमेंटमध्ये अधिकारी हुद्द्यावर रूजू होणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या युनिटमधून ही परीक्षा उत्तीर्ण होणारे ते पहिलेच आहेत.

    सॉलोमन हे मूळचे मणिपूरच्या सुग्नू चांडेल जिल्ह्यातील मोल्नोई गावातील असून, त्यांचे वडील मणिपूर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सन २००८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. सॉलोमन बारावीनंतर २०२० मध्ये आसाम रेजिमेंटच्या शिलाँग येथील भरती केंद्रातून भारतीय सैन्यात दाखल झाले. त्यानंतर प्रशिक्षणानंतर ते १५ आसाम रेजिमेंटमध्ये जवान या पदावर रूजू झाले. १५ आसाम रेजिमेंटमधील आपल्या प्लॅटूनमध्ये दोन वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर सॉलोमन यांच्या वरिष्ठांनी त्यांना एसीसीच्या माध्यमातून अधिकारी पदासाठीच्या संधीची माहिती दिली.
    अवकाळीग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या; नाशिक जिल्ह्यासाठी छगन भुजबळ यांची मागणी
    २०२३ मध्ये त्यांनी या परीक्षेची तयारी सुरू केली. याचदरम्यान मणिपूरमध्ये सॉलोमन यांच्या जिल्ह्यातही हिंसाचार उफाळला. कुकी जमातीच्या सॉलोमन यांच्या गावातील सर्व घरे पेटवण्यात आली. त्यांचे घर आणि घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांच्या कुटुंबीयांना जवळच्या डोंगरात आश्रय घ्यावा लागला.या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, इंग्रजी भाषेबद्दलच्या न्यूनगंडावर मात करीत सॉलोमन यांनी परीक्षा दिली. लेखी परीक्षेत ते उत्तीर्णही झाले. मुलाखत फेरीत ते बाद ठरले. मात्र, खचून न जाता त्यांनी आणखी तयारी करीत पुन्हा परीक्षा देत यश संपादन केले. त्यासाठी रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या पत्नी यांनी मोलाची मदत केली.
    दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर भीषण अपघात; विमान दुर्घटनेत १७९ मृत्यूमुखी, तर २ बचावले
    ‘आर्मी कॅडेट कॉलेज परीक्षा काय आहे ?
    लष्करात कार्यरत असलेल्या जवान, शिपाई पदांवरील सैनिकांना अधिकारी पदावर जाण्याची संधी देणारी परीक्षा म्हणून आर्मी कॅडेट कॉलेजच्या परीक्षेकडे पाहिले जाते. सैन्यातील २१ ते २७ वयोगटातील दोन वर्षांची सेवा पूर्ण केलेले सैनिक ही परीक्षा देऊ शकतात. वर्षातून दोनदा होणाऱ्या या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आर्मी कॅडेट कॉलेजमध्ये तीन वर्षे आणि इंडियन मिलिट्री अकॅडमीमध्ये एक वर्षे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *