Diva Attack on Assistant Commissioner: अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करायला गेलेल्या दिव्याच्या सहाय्य्क आयुक्तांवर गाळेधारकाने हल्ला करत त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने दिव्यात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
सहाय्यक आयुक्तांवर गाळेधारकाचा हल्ला
कल्याण फाटा या ठिकाणी चार ते पाच अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारच्या सुमारास दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे आपल्या टीम सोबत कल्याण फाटा या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचले. यावेळी एका गाळेधारकाची आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पालिकेचे अधिकारी या गाळेधारकाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कारवाईला विरोध करत या गाळेधारकाची बाचाबाची सुरूच होती. अखेर सहाय्यक आयुक्त घुगे हे कारवाईसाठी पुढे आल्यानंतर यातील एका व्यक्तीने त्यांच्या पाठीमागून जोरदार फटका मारला. तर दुसऱ्याने त्यांना धमकावत दूरपर्यंत खेचत नेले. यामध्ये त्यांच्या हाताला देखील फ्रॅक्चर झाले आहे.
हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, हल्ला करणाऱ्या दोघांच्या विरोधात सरकारी कामांत अडथळा आणणे तसेच अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३५२ आणि ३५३ ही कलमे लावली असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांकडून व महापालिकडून कठोर कारवाई झाली पाहिजे व दिवा प्रभाग समिती अंतर्गत चालू असणाऱ्या अनधिकृत बांधकाम व फेरीवाले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उबाठा पक्षाचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.