Raigad News : उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पाचही जणांना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहरात व तालुक्यातील अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे परप्रांतीय नागरीक उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, पोटात दुखण्याची कारणे समोर येत आहेत.त्यातच शनिवारी ( दि२८) दिघोडे बस स्थानका जवळील रस्त्यावर विकला जाणारा शॉरमा हा खाद्यपदार्थ शुभम पाटील, शुभम ठाकूर, निशांत भगत, रोहन पाटील व एक लहान मुलगा यांनी खाल्ल्याने त्यांना पोटात दुखायला लागले तसेच उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडीने चिरनेर गावातील रवि क्लिनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉ प्रकाश मेहता यांनी सदर रुग्णांवर उपचार सुरू केले. आज डॉ प्रकाश मेहता यांच्या तत्परतेने सदर रुग्णांचे प्राण वाचले आहेत. तरी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व उघड्यावर विक्री करणाऱ्या अशा व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
“सदर रुग्णांनी उघड्यावरील शॉरमा हा अन्न पदार्थ खाल्ल्याने त्यांना फुड पॉयजन ( अन्नातून विषबाधा) झाले आहे. त्याची प्रकूती चांगली आहे. तरी नागरीकांनी, विशेष करून लहान मुलांनी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत” – डॉ प्रकाश मेहता