Nagpur Crime News: नागपुरात गुरुवार पवन हिरणवार याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रथम शाक्य याने पवनच्या हत्येचा कट रचून त्याची हत्या केली आहे.
हत्येची ही घटना खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळखेडा परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरानजिक घडली. पवन आणि त्याच्या टोळीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी महिन्यात पवन याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. जुलै महिन्यात तो कारागृहातून बाहेर आला होता. पवन, हिमांशू आणि सोनू शेंद्रे हे गुरुवारी दुपारी एमएच ४७ बीके ०३२३ क्रमांकाच्या कारने पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनाला गेले. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सर्वजण दर्शन घेऊन कारने परत जात होते. यादरम्यान आरोपींनी त्यांना गाठले व गोळीबार केला. यात पवनचा मृत्यू झाला तर हिमांशू गजभिये आणि शैलेश ऊर्फ बंटी हिरणवार हे जखमी झाले. पोलिसांनी आज चौघांना अटक केली असून शेखूसह अन्य आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत.
प्रथम याचे वडिल एका राजकीय पक्षाचे सदस्य असून सक्रिय आहेत. पवन त्यांना खूप त्रास देत असल्याचे कळते. तसेच आरोपी भुसारीला पवनने दोन वर्षांपूर्वी बेदम मारहाण केली होती. त्या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यामुळे प्रथम आणि भुसारी या दोघांनाही पवनचा काटा काढायचा होता. मात्र, पवनसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने ते सोपे नव्हते. त्यामुळे एका मित्राच्या माध्यमातून हे दोघे शेखूच्या संपर्कात आले. शेखू आणि हिरणवार टोळीचेही वैर होतेच. प्रथम व त्याच्या साथिदारांनी शेखूच्या मार्गदर्शनात पवनच्या हत्येचा कट रचला व त्याची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांमार्फत प्राप्त झाली आहे.
सिद्धार्थने दिली माहिती पवनला निवडणुकीपूर्वीच तडीपार करण्यात होते. तरीसुद्धा तो अधून मधून शहरात फिरत असे. सिद्धार्थ कोवे त्याच्यासोबत राहत असे. शेखूने प्रथमला पवनवर पाळत ठेवण्याचा सल्ला दिला. प्रथमने कोवेच्या माध्यमातून पवनवर पाळत ठेवली. पवनला शहरात मारणे धोक्याचे होते. गुरुवारी आधी जामसावलीला जाण्याचा प्लॅन ठरला. मात्र, नंतर पंचमुखी हनुमानाच्या दर्शनाचा प्लॅन ठरला. ही माहिती कोवेने प्रथमला दिल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या माहितीच्या आधारावर आरोपींनी हत्येचा कट रचून त्याची अंमलबजावणी केली.