• Fri. Dec 27th, 2024
    पांडुरंगा विठ्ठला… तेव्हा ती करत होती देवाचा धावा! अजित पवारांनी बारामतीत सांगितला किस्सा

    Ajit Pawar: विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर बारामतीत परतलेल्या अजित पवारांचा नागरी सत्कार आज संपन्न झाला. यावेळी त्यांनी त्यांच्या आईची एक खास आठवण सांगितली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    – दीपक पडकर

    बारामती: विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर बारामतीत परतलेल्या अजित पवारांचा नागरी सत्कार आज संपन्न झाला. यावेळी त्यांनी त्यांच्या आईची एक आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी सुरु असताना सुरुवातीच्या कलांमध्ये अजित पवार बारामतीत पिछाडीवर अशा बातम्या आल्या. सकाळच्या सुमारास या बातम्या आल्यानंतर अजित पवारांच्या घरी नेमकं काय घडलं, ते आज त्यांनीच जाहीर सत्कार सोहळ्यात सांगितलं.

    ‘आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही मला मताधिक्य दिलं. मात्र ही लोकसभेच्या निकालानंतरची आठवी निवडणूक होती. या निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी काही माध्यमांनी तर कहरच केला होता. पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर अशा बातम्या लागल्यावर आमच्या मातोश्री देवघरात जाऊन बसली. त्यावेळी माझी मोठी बहीण आईजवळ होती. तिला आई म्हणाली, रजू अक्का असं कसं झालं.. तेव्हा ती म्हटली की हे असं नाही.. आम्ही बारामतीत फिरलो आहे. काळजी करू नको. तेव्हा ती “पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा ” असा देवाचा जप करत बसली. त्यानंतर मी एकाला फोन केला. त्याच्याकडून माहिती घेतली असता, त्यानं सांगितलं की, आपल्याला ६० ते ७० टक्के मतं मिळत आहेत. आपण आत्ता पुढे आहोत,’ असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.
    शिंदेंसोबतच्या सुप्त संघर्षाचा निकाल; खातेवाटपात ‘जुना पॅटर्न’, फडणवीसांनी नेमकं काय साधलं?
    सकाळपासून जी काय बारामतीकरांनी बटन दाबायला सुरुवात केली. त्याच्यात आपण मागे राहिलो नाही. सतत पुढे चाललो. बारामतीकरांचं, नागरिकांचं, अनेक कार्यकर्त्यांचं, सर्वांचंच असं मत होतं की, आपल्याला लाखांच्या पुढे मताधिक्य मिळवायचंय आणि खरोखरच बारामतीकरांनी उभ्या महाराष्ट्राला हे खरं करून दाखवलं. आजवरच्या सर्वात जास्त माझ्या राजकीय कारकिर्दीतील विकास या पंचवार्षिकमध्ये करणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना दिला.
    भाईंना ठाण्यात आव्हान देण्याची तयारी; भाजपनं ताकद लावली, दुसरे दादा नडणार, इतिहास घडणार?
    राज्यासह बारामतीकरांनी लोकसभेला झटका दिल्याने माझ्यासह कार्यकर्ते सुद्धा चिंतेत होतो. परंतु आम्ही ईव्हीएमला दोष न देता नव्या जोमाने कामाला लागलो. काही योजना आणल्या. मतदारांपुढे व्हिजन मांडले. त्यामुळे विधानसभेला महायुती न भूतो न भविष्यती यश मिळाले. त्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. हा निकाल महाविकास आघाडीला पचलेला नाही. त्यामुळे ते ईव्हीएमवर टीका करत आंदोलन करत आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा ईव्हीएमवर शंका घेणं अयोग्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. केवळ कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून मविआ आंदोलन करत असल्याची टीका पवार यांनी केली. काँग्रेस एकसंध असताना आणि विरोधी पक्ष कमकुवत असतानाही राज्याच्या स्थापनेपासून आजवर असं यश मिळालं नव्हतं असं पवार म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed