• Sat. Dec 28th, 2024
    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    Sindhudurg Accident: सिंधुदुर्गात भीषण अपघात झाला असून कार आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    Lipi

    अनंत पाताडे, सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकी घेऊन जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. कुडाळ येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीच्या पुलावर झाल्याची माहिती आहे. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या वसुंधरा जनार्दन मांजरेकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कार चालक वरुण आनंद दामले (राहणार डोंबिवली पूर्व) यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे ब्राह्मणवाडी येथील जनार्दन बापू मांजरेकर आणि त्यांची पत्नी वसुंधरा मांजरेकर हे दोघेही कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै विद्यालय येथे असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते कार्यक्रमासाठी जात होते. ते दोघे (एमएच ०७ एए ६८३१) स्कुटर घेऊन कार्यक्रम स्थळी जात होते. त्यांची स्कुटर भंगसाळ नदीच्या पुलावरून पुढच्या दिशेने कुडाळ शहर सर्विस रस्त्याच्या दिशेने येत असताना मुंबई ते गोवा या दिशेने जाणाऱ्या अल्टो कार क्रमांक (एमएच ०५ एफबी ९७१३) या गाडीचे चालक वरुण आनंद दामले यांनी स्कूटरला जोरदार धडक दिली.

    या धडकेमध्ये जनार्दन मांजरेकर आणि वसुंधरा मांजरेकर हे दाम्पत्य रस्त्यावर पडले. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. दरम्यान, कारचालक वरुण दामले यांनी आपल्या कारमध्ये बसवून त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, इथे उपचार होत नसल्यामुळे त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. हे उपचार सुरू असताना वसुंधरा मांजरेकर यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत तिचे पती जनार्दन मांजरेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार कार चालक वरुण दामले यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास सुरु आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed