• Sun. Dec 29th, 2024
    राजकारणात काय काय पाहावे? ‘त्या’ यादीत आता शिंदे सहावे; देवाभाऊंच्या नावाखाली भाईंचं नाव

    Eknath Shinde: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज आझाद मैदानात संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. आधी मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर, अन्य मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करणारे ते सहावे नेते ठरले आहेत.

    एकनाथ शिंदे यांच्या आधी दोन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाला, आघाडीला सत्ता मिळवून दिली. पण त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. काँग्रेसचे शंकरराव चव्हाण १९७५ ते १९७७ या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यावेळी देशात आणीबाणी लागू होती. चव्हाण पायउतार झाल्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. यानंतर पुलोदचा प्रयोग करत शरद पवार वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. तेव्हा शंकरराव चव्हाण यांनी मंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे पवारांनी चव्हाणांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं होतं. शंकरराव चव्हाण १९८६ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले.
    Devendra Fadnavis: ‘त्या’ लाडक्या बहिणींचा पुनर्विचार होणार! CM होताच देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान
    काँग्रेसचे शिवाजीराव पाटील निलंगेकर १९८५ मध्ये मुख्यमंत्री झाले. ते २००३ मध्ये मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात होते. शिंदे यांच्यानंतर अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नारायण राणेंनी काँग्रेसच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं.

    देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री राहिले. २०२२ मध्ये ते एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे आधी मुख्यमंत्री राहून मग अन्य मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करणारे ते पाचवे नेते ठरले. आता या यादीत शिंदे यांचा क्रमांक लागला आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर आता शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.
    Devendra Fadnavis: CM झाल्यानंतर फडणवीसांची पहिली स्वाक्षरी ‘त्या’ फाईलवर; शिंदेंची परंपरा देवाभाऊंकडून कायम
    मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी काम करुन मग पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जमा झाला आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंच फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं होतं. आता फडणवीस मुख्यमंत्रिपदी आल्यानं शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आहे. आता शिंदे भविष्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच कमबॅक करणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *