परभणी लोकसभा मतदारसंघातील परतूर येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभेमध्ये महादेव जानकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव लोणीकर, राजेश विटेकर, राहुल लोणीकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा-ओबीसी वाद लावण्याचा प्रकार करू नका, सारथीसाठी माझे काम
महादेव जानकर म्हणाले, मी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले होते. त्यावेळेस मी फडणवीसांसोबत सारथी या संस्थेची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. सारथीचा मी सदस्य देखील होतो. त्यानंतर आमच्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देखील देण्यास सुरुवात केली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण ओबीसीच्या धर्तीवर दिले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा फायदाच होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी मराठा ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न करू नये, असेही जानकार म्हणाले.
संजय जाधव यांनी परभणी जिल्हा भकास करून ठेवला
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर टीका करताना जानकर म्हणाले, त्यांच्या काळात परभणी जिल्हा भकास झाला आहे. परभणी जिल्ह्यातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पिण्यासाठी पाणी देखील पंधरा-पंधरा दिवस मिळत नाही. या संजय जाधव यांनी आपल्या निधीपैकी ४५ टक्के निधी खर्चाविना वाया घालवला आहे. त्यामुळे परभणीच्या विकासासाठीच मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.
फडणवीसांनी मराठा आणि धनगर दोन्ही समाजााचा उद्धार केला
मराठा समाज आणि धनगर समाजाला खरा न्याय देण्याचा प्रयत्न एक ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. धनगर समाज आदिवासी आहे. या धरतीवर त्यांनी आदिवासींच्या सर्व योजना लागू केल्या आणि धनगर समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मराठा समाजाला देखील आरक्षण देण्याचे काम हे केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जातीवादी ब्राह्मण म्हणून संबोधणे अयोग्य आहे. त्यांनी या दोन्ही समाजाचा उद्धार केला आहे, असेही महादेव जानकर म्हणाले.