• Tue. Mar 10th, 2026

    Bike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

    Bike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

    Pratap Sarnaik: राज्य सरकारने शहरातील बाईक टॅक्सी सेवेला दणका दिला आहे. ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई व परिसरात वाढत असलेल्या बेकायदा बाइक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी घोषणा परिवहनमंत्री यांनी विधान परिषदेत केली.

    आमदार सुनील शिंदे यांनी नियम ९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेवर निवेदन करताना मंत्री सरनाईक यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकारच्या ‘मोटार वाहन अ ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२०’नुसार महाराष्ट्रात ई-बाइक (दुचाकी) टॅक्सी वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली असून राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र ई-बाइक-टॅक्सी नियम, २०२४ अधिसूचित करण्यात आले असून यानुसार बाइक टॅक्सी १०० टक्के इलेक्ट्रिक असणे बंधनकारक आहे. तसेच सर्व अटी व नियमांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना ठराविक कालावधी देण्यात आला आहे. या प्रक्रियेनुसार उबर इंडिया सिस्टिम्स प्रा. लि., रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात ३० दिवसांसाठी तात्पुरता परवाना देण्यात आला होता.

    ३३ लाखांची दंडवसुली

    बाइक टॅक्सींची पथकांमार्फत तपासणी करून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत १३० दुचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे ३३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारने बाइक टॅक्सी सेवा नियमानुसार आणि सुरक्षित पद्धतीनेच सुरू राहील यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.

    Maharashtra TimesAuto Rickshaw Permit : राज्यात आजपासून रिक्षा परवाना देण्यास स्थगिती, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

    नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती

    राज्यात नव्या रिक्षांसाठी परवाना देण्याची प्रक्रिया तब्बल नऊ वर्षांनंतर तूर्तास बंद होणार आहे. वाढती वाहतूककोंडी आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नव्या परवान्यांना सोमवार, ९ मार्चपासून स्थगिती देण्याची घोषणा परिवहन विभागाने केली. केंद्र सरकारने राज्याला निर्णयाधिकार दिल्यानंतर परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा