• Sat. Sep 21st, 2024
सांगलीत विशाल पाटील बॉम्ब टाकण्याचे संकेत, लवकरच निर्णय घेतील, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

अकोला : सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी केंद्रीय राज्यमंत्री, काँग्रेस नेते प्रतिक पाटील यांनी बुधवारी अकोल्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. आंबेडकरांच्या अकोल्यातील ‘यशवंत भवन’ या निवासस्थानी उभय नेत्यांची भेट पार पडली. यावेळी विशाल पाटलांनी सांगलीतून उमेदवारी दाखल करावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. भेटीनंतर विशाल पाटील लवकरच निर्णय घेतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्याने सांगलीचा तिढा जर सुटला नाही तर ते वंचितकडून लढणार का? प्रकाश आंबेडकर त्यांना उमेदवारी देणार का? असे प्रश्न सध्या सांगलीच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.
विशाल पाटील नॉट रिचेबल, भाऊ प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, सांगलीत मविआला धक्का?

बैठकीनंतर विश्वजित कदम काय म्हणाले?

सांगलीतील राजकीय परिस्थिती आणि सत्य वस्तुस्थितीची पारख करुन येथील लोकसभेच्या उमेदवाराबाबत फेरविचार करावा, अशी विनंती काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली. सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आम्ही राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधून सांगली लोकसभेच्या जागेबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचा विचार करु, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सांगलीचा तिढा सुटणार? विशाल पाटलांचे मोठे संकेत, संजय राऊतांनाही सल्ला


जागा वाटपाबाबत ज्या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांत सांगलीची जागा आपल्याला मिळायला हवी, ही भावना आम्ही सातत्याने मांडली. सांगलीत काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. ही काँग्रेसची मजबूत बाजू आहे. त्यामुळे इथली जागा काँग्रेसला मिळणे संयुक्तिक आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed