• Thu. Jun 11th, 2026

    केवळ हलक्या वाहनांना टोलमाफी? पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोंडीत 5 कोटींची वसूली; टोलमाफीचा प्रस्ताव सादर

    केवळ हलक्या वाहनांना टोलमाफी? पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कोंडीत 5 कोटींची वसूली; टोलमाफीचा प्रस्ताव सादर

    Toll Refund: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर फेब्रुवारीत झालेल्या 32 तासांच्या वाहतूककोंडीत 5 कोटींची टोल वसूली झाली आहे. यापैकी केवळ हलक्या वाहनांना टोल परत करण्याबाबत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीत अडकलेल्या हलक्या व जड वाहनांकडून ३२ तासांत सुमारे ५ कोटी १६ लाख रुपयांचा टोल वसूल झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांच्या संतापानंतर हलक्या वाहनांचा टोल परत करण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सुमारे एक कोटी ५३ लाख रुपये वाहनचालकांना परत द्यावे लागतील, असा अंदाज आहे. याबाबत राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.

    पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्गावरील अडोशी बोगद्याजवळ ३ फेब्रुवारी रोजी ज्वलनशील पदार्थाचा टँकर उलटल्याने महामार्गावर सुमारे ३२ तास वाहतूककोंडी झाली होती. या काळात महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. खाणे-पिणे व इतर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल झाले. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत चहा, पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली. या दरम्यान ३ फेब्रुवारी सायंकाळी ५ ते ५ फेब्रुवारी पहाटे २ वाजेपर्यंत टोलनाक्यांवर वाहनांकडून टोल वसूल करण्यात आला. वाहतूक कोंडीत अडकूनही टोल आकारल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर टोल परत करण्याची मागणी जोर धरली. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळाने टोलमाफीबाबत सकारात्मक विचार सुरू केला आहे.

    Maharashtra TimesBike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

    टोलमाफीचा प्रस्ताव

    महामंडळाने वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांना टोल परत देण्याबाबत एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात कार, प्रवासी बस आणि मिनी बस यांसारख्या वाहनांना टोल परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

    Maharashtra TimesTraffic E-Challan: वाहतूकदारांना दिलासा मिळणार? थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव; राज्य सरकारकडे सादर

    या टोलमाफीचा फायदा प्रामुख्याने द्रुतगती महामार्गावरील वाहनांना होणार आहे. या वाहनांसाठी तब्बल १ कोटी २५ लाख २२ हजार १४६ रुपयांचा टोल परत केला जाऊ शकतो. तसेच, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांसाठी २८ लाख ११ हजार २८३ रुपये परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, द्रुतगती महामार्गावरील शेडुंग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खालापूर आणि तळेगावदरम्यान येणाऱ्या शिळ फाटा येथील टोलनाक्यांवर या निर्णयाचा विशेष परिणाम होणार नाही. त्यामुळे या टोलनाक्यांवरील वाहनांचा टोल परत देण्याचा विचार सध्या तरी करण्यात आलेला नाही.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा