म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सौराष्ट्र-कच्छ, उत्तर कर्नाटक व नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यासह थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही मार्च अखेरीसच उष्ण लाटांचा सामना करावा लागतो आहे. हंगामातील आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद बुधवारी मालेगावमध्ये ४२ अंश सेल्सिअस इतकी झाली. नाशिक शहरात ३९.४ इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे भरदुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.गेल्या आठ दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील तापमानाचा आलेख सातत्याने वाढतो आहे. दरवर्षी उन्हाच्या हंगामात साधारणत: एप्रिल अखेर ते मे महिन्यात जाणविणारा उष्मा यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच जाणवू लागला आहे. दरम्यान, आणखी चार दिवस कमाल व किमान तापमानात राज्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नाशिक शहराचा पाराही काही दिवसांत चाळिशीपार जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ दिवसांत तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे. किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना उष्ण हवामानाचा सामना करावा लागतो आहे.
चार दिवसांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
रविवार : ३६.८
सोमवार : ३७.७
मंगळवार : ३८.३
बुधवार : ३९.४
चार दिवसांचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
रविवार : ३६.८
सोमवार : ३७.७
मंगळवार : ३८.३
बुधवार : ३९.४