Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: आखाती देशातील युद्धामुळे गॅस पुरवठा ठप्प असल्याचे चित्र आहे. त्याची झळ उद्योगासह सर्वसामान्यांनाही बसते आहे. प्रशासन पुरवठा मुबलक असल्याचा दावा करीत असले, तरी परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गॅसटंचाईमुळे निवासी शाळा, वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना भोजन कसे उपलब्ध करून द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच शहरातील नामांकित अशा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गॅस टंचाईचा फटका बसला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वसतिगृहातील खानावळ ‘को-ऑपरेटिव्ह’ पद्धतीने चालवली जाते. विद्यार्थ्यांना वाजवी दरात, दर्जेदार जेवण मिळावे या हेतुने ही खानावळ चालवली जाते. परंतु, गॅस सिलिंडर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना चुलीचा पर्याय निवडावा लागला आहे. महाविद्यालय परिसरातील लाकूडफाटा विद्यार्थी, कर्मचारी जमा करतात. आणि चुलीसमोर ठेवला जातो. त्यानंतर स्वयंपाक होतो. सकाळ आणि दुपारी अशा दोन्हीवेळेस पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी खाणावळीत जेवण करतात.
Chhatrapati Sambhajinagar News : माफीनाम्यानंतरही तणाव, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना जमावाकडून मारहाण
विद्यार्थीच करतात व्यवस्थापन
महाविद्यालयात मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह आहे. त्यात मुलांच्या वसतिगृहात अनेक वर्षांपासून ‘को-ऑपरेटिव्ह’ पद्धतीने मेस चालविल्या जाते (करोना कालावधी वगळून). ज्यात सर्वकाही नियोजन विद्यार्थ्यांचेच असते. ज्यात ‘फायनान्स’, ‘फूड’, ‘किराणा खरेदी’, ‘स्वच्छता’ अशा विविध कमिटी असते. नियमित मेन्यू, किराणा, स्वयंपाक, साफसफाई, हिशोब अशी सर्व कामे विभागून केली जातात.
‘मेन्यू’मध्ये झाली कपात
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती आली. विद्यार्थ्यांनी चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्यात अनेक अडचणी येतात. मुख्य किचनमध्ये स्वयंपाक न करता आता बाहेर मैदानात स्वयंपाक केला जातो. सकाळी लवकर तयारी सुरू करावी लागते आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालविणाऱ्या जाणाऱ्या खाणावळीत आता मेन्यूही कमी झाला आहे. सकाळी आणि सायंकाळी लवकर शिजतील अशा भाज्यांवरच भर दिला जातो आहे. आणि चपाती, पोळी आधीच करून ठेवण्यात येतात. तळलेले अनेक पदार्थ कमी करण्यात आले आहेत. पुढील काळात आव्हाने पेलताना काळजी घ्यावी लागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
Imtiaz Jaleel : ‘चक्क मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बनवले बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड अन् कास्ट सर्टिफिकेट’; जलील यांचा गंभीर आरोप
आम्ही विद्यार्थी वसतिगृहातील खानावळ ‘को-ऑपरेटिव्ह’ पद्धतीने चालवतो. खरेदी, मेन्यू, खर्च अशा सर्वांचे व्यवस्थापन विद्यार्थीच करतात. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आहे. परिसरातील लाकूडफाटा हे पारंपरिक इंधन आम्ही जमा करून देतो. गॅस टंचाई असल्याने मेन्यूमध्येही आम्ही बदल केले आहेत. गरमगरम चपाती देता येत नाही. कारण चपाती आधी करून ठेवली जाते. लवकर शिजतील अशाच भाज्यांवर आम्ही भर देतो आहोत. -भावेश कानडे, विद्यार्थी सरचिटणीस, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
