• Sat. Sep 21st, 2024

सांगलीत एक घाव दोन तुकडे, हातकणंगलेमध्ये शेट्टींची धाकधूक वाढली, ठाकरे काय निर्णय घेणार?

सांगलीत एक घाव दोन तुकडे, हातकणंगलेमध्ये शेट्टींची धाकधूक वाढली, ठाकरे काय निर्णय घेणार?

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाजूला लागून असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अद्यापही कोणताही निर्णय झाला नसल्याने बाहेरून पाठिंबा मागणारे राजू शेट्टी यांची धाकधूक वाढली आहे.

महाविकास आघाडीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटासोबत गेल्याने या जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात सक्षम उमेदवार नसल्याने कोण उमेदवार द्यायचा याबाबत संभ्रमाचे वातावरण अद्याप देखील आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर पुन्हा खासदार होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांशी ही फारकत घेत एकला चलो रे चा नारा दिला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी आपल्याला महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
राजकारण: शेट्टींची ठाकरेंशी गट्टी? हातकणंगलेत भाजपमुळे सेनेची कोंडी; खासदार मानेंची गोची

याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत या संदर्भात चर्चा केली. तर राजू शेट्टीनी महाविकास आघाडीमध्ये येऊन मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट ठाकरेंनी राजू शेट्टी यांच्यासमोर ठेवली होती. मात्र याला राजू शेट्टी यांनी स्पष्ट नकार देत ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने शिवसेना ठाकरे गट त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याबाबत विचारधीन आहे. या संदर्भात शिवसेना व महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये चर्चा सुरू असून येत्या २ ते ३ दिवसात निर्णय येण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; उद्धव ठाकरेंच्या सभेला काँग्रेस नेते जाणार की नाही?

दरम्यान, आज ठाकरे गटाने राज्यातील १७ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा दिली असल्याची चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अद्याप ठाकरे गटाकडून मला बाहेरून पाठिंबा देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. आज सकाळीच माझी संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे. ते सकारात्मक दिसत असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी बोलणी सुरू आहे. येथे दोन ते तीन दिवसात या संदर्भात निर्णय घेण्याची अपेक्षा असल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
मविआकडून श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारी, राजू शेट्टी म्हणतात; छत्रपतींविरोधात…

एका बाजूला राजू शेट्टी यांच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून चर्चा सुरू असतानाच जर राजू शेट्टी यांना पाठिंबा नाही दिला तर येथे आपला स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी देखील ठाकरे गटाने सुरू केली आहे. शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिणचेकर व शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अन्य एका उमेदवाराच्या नावाची चाचपणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघात ठाकरे राजू शेट्टींना पाठिंबा देत दुरंगी लढत करणार की स्वतंत्र उमेदवार देत तिरंगी लढत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed