नमाजसाठी निघालेल्या कामगारांचा पिकअप टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत. ही घटना रामराज-भिलजी मार्गावरील घटना. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
परप्रांतीय कामगार
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग–रोहा राज्य महामार्गावरील उसर परिसरात ‘गेल’ कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी देशातील विविध राज्यांतून आलेले अनेक परप्रांतीय कामगार खासगी ठेकेदारामार्फत येथे काम करत आहेत. शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी वेळेत पोहोचता यावे म्हणून काही कामगार काम आटोपून पिकअप टेम्पोमधून रामराजकडे निघाले होते.
चालकाचा ताबा सुटला
दरम्यान, रामराज–भिलजी मार्गावरील भिलजी–बोरघर येथील धोकादायक वळणावर पोहोचताच टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो अचानक पलटी झाला. अपघात इतका अचानक घडला की वाहनातील कामगारांना स्वतःला सावरण्याची संधीही मिळाली नाही. क्षणार्धात झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
Kalyan News : पती सोडून गेला… पण आई हरली नाही! हातात ऑटोची स्टेअरिंग, शेजारी 3 वर्षांची चिमुकली; मुलीच्या भविष्यासाठी संघर्ष
एकाचा मृत्यू, अनेक जखमी
या अपघातात खुशमुहम्मद अल्लाउद्दिन (रा. उसर, ता. अलिबाग) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कौसर उस्पात मल्लिक यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय मोहम्मद आरिफ रफिक, सोहेब अलीबास अली, पिंटूशेट बिदूशेट शेख, असीम फिरोज खान, रोजमहमद अली शहीद, इंतजार हुसैन, तारीफ अल्ताफ आयुब हुसैन, नाहीद वाहिद हुसैन, मोहम्मद जीशान फुलाकांत खान, फारूक अल्ताफ मलिक, तस्लीम शौकत हुसैन, अरमान अल्ताफ हुसैन, इब्राहीम इन्सार अली, येजाज बाबू अन्सारी, नुसरत अब्दुलसत्तार अली, महम्मद अस्लम वकील, अफरोज इब्राहीम अन्सारी, महमद शान इसरार अहमद, महमद मुसरान अराफाक आणि राहतअली कासिम अली (सर्व रा. उसर, ता. अलिबाग) हे जखमी झाले असून त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागरिकांची तत्काळ मदत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी नागरिकांनी मोठी मदत केली. दरम्यान, रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, गांगुर्डे तसेच पोलीस हवालदार महेंद्र राठोड उर्फ बंड्या राठोड यांनी घटनास्थळी भेट देत मदतकार्याचा ताबा घेतला.
Dombivli News : ‘गॅस बंद होणार’चा मेसेज, लिंकवर क्लिक आणि खातं रिकामं; डोंबिवलीत महिलेला 3 लाखांचा फटका
सुरक्षित वाहतुकीची मागणी
या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून औद्योगिक प्रकल्पांवर काम करणाऱ्या कामगारांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
